धाराशिव – समय सारथी
तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव बालिश निकम यांच्यावरील जीवघेणा हल्ला प्रकरण हे बनाव असल्याचे पोलिस तपासात उघड झाले असुन सरपंच यांनी त्यांच्या साथीदारासोबत बंदूक परवाना मिळाविण्यासाठी स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. पवनचक्की वादातुन हा हल्ला झाल्याचा आरोप करीत सरपंच यांनी टाकीवर चढून आंदोलन केले होते मात्र हा सगळा स्टंट असल्याचे उघड झाले. पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, सपोनि भालेराव, चासकर यांच्या पथकाने हा तपास केला.
सरपंच हल्ला प्रकरणी चार अज्ञात आरोपी विरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कदम यांच्या गाडीवर पेट्रोल, अंडे व दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला असे चित्र रंगवण्यात आल्याचे अखेर उघड झाले. सरपंच नामदेव निकम यांनी तक्रार दिली होती की, 26 डिसेंबर रोजी रात्री ते व प्रवीण इंगळे हे तुळजापुरवरुन जवळग्याला परतत होतो. त्यावेळी माझ्या गाडीच्या दोन्ही बाजुंनी अचानक दोन बाईक आल्या. बाईकस्वार सतत हॉर्न वाजवत होते. त्यांना पुढे जायचे आहे असे आम्हाला वाटले आणि आम्ही गाडी रस्ताच्या मधोमध आणून स्लो केली. आमच्या गाडीचा वेग जसा कमी झाला तसा एका बाजूने गाडीवर दणका बसला. डाव्या बाजूच्या दरवाजाची काच फोडून आमच्या गाडीत पेट्रोलचे फुगे टाकण्यात आले. तेव्हा आम्ही गाडीचा वेग वाढवला आणि पुढे गेलो. त्यानंतर आमच्या गाडीच्या काचेवर अंडी फेकण्यात आली. अंडी फेकल्यामुळे समोरचं काही दिसेनासे झाले. त्यामुळे आमची गाडी पुन्हा स्लो झाली. त्यानंतर गुंडांनी गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला त्याचा पोलिसांनी कसुन तपास केला असता सत्य उघड झाले.