सिरेंटीका रिन्यूएबल कंपनीची सकारात्मक भुमिका तर रिन्यू कंपनीची मुजोरी कायम
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भूम आणि वाशी परिसरातील शेतकरी मावेजावरून काही पवनचक्की कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात मागील तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. या उपोषणाला भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भेट दिली व शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींंसमवेत बैठक घेतली. समान मोबदल्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असुन आंदोलन सुरूच राहणार असल्याची भुमिका घेतली.
सिरेंटीका रिन्यूएबल कंपनीचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थिती होते, त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी संमती दाखवली तर रिन्यू कंपनीचा मुजोरपणा पहायला मिळाला. जिल्हाधिकारी यांनी सांगूनही ते बैठकीला आले नाहीत, उलट त्यांनी शेतकऱ्यांशी झालेले करारपत्र व इतर बाबी देण्यास स्पष्ट नकार दिला. दर निश्चिती व तफावत यात तोडगा काढण्यासाठी अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती समिती गठीत करण्यात आली. शेतकरी यांच्यासोबत झालेले करार 11 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिकारी यांना देण्याची व संयुक्त सर्वे करण्याची तयारी सिरेंटीका रिन्यूएबल कंपनीने दाखवली शिवाय जिल्हाधिकारी जो निर्णय देतील तो कंपनीला मान्य असेल, असे सांगितले.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात पवनचक्की उभारणीचं काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या संमतीविना किंवा कोऱ्या करारनाम्यांवर सह्या घेऊन काम सुरू करण्यात आले आहे. काही करारनाम्यांमध्ये मजकूर नसताना शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या गेल्या असून, काही ठिकाणी मिळालेला मोबदला हजारांत, तर काही ठिकाणी लाखांत आहे, ही मोठी तफावत अन्यायकारक आहे असे सुजितसिंह ठाकुर पत्रकार यांच्याशी बोलताना म्हणाले.
समान मोबदला मिळावा ही शेतकरी यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस सिरेंटिका कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते, मात्र रिन्यू कंपनीचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले, याची नोंद जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे, ते पुढील पाऊल उचलतील असे ते ठाकुर म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत एसएमएस पाठवण्यात आला असून, 31 जुलै रोजी मुंबई भेटीत मुख्यमंत्री यांना थेट तक्रार करणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही हे मुद्दे सांगून तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची संमती नसतानाही पोलिस बळ, दलाल आणि गुंडांच्या मदतीने टॉवर उभारले जात असल्याचे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले. या टॉवरच्या विद्युत वाहिन्या ज्या जमिनीवरून जात आहेत, त्या जमिनी शेतकऱ्यांना भविष्यात वापरता येणार नाहीत. त्यामुळे अशा जमिनींचे पंचनामे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सिरेंटिका कंपनीने शेतकऱ्यांसोबत केलेले करारनामे इंग्रजी भाषेत आहेत आणि ते अद्याप शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर हे करारनामे मराठीत अनुवादित करून शेतकऱ्यांना देण्यात यावेत, असा निर्णयही घेण्यात आला आहे.
आजपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या अधिकाऱ्यापर्यंत पोचल्या नव्हत्या, त्या या बैठकीच्या निमित्ताने प्रभावीपणे मांडण्यात आल्या असून, यावरून मार्ग निघेल असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला. वाशी तालुक्यात अनेक वेळा पोलिसांनी आर्थिक व्यवहार करून कंपनीच्या बाजूने बळाचा वापर करत शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. यासंदर्भात त्यांनी पोलीस प्रमुख ऋतू खोकर यांच्याशीही चर्चा केली असून, शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीत दलाल आणि गुंडांचा हस्तक्षेप सातत्याने वाढत चालला आहे असा आरोप ठाकुर यांनी केला.