गडबड की खोडा ? आकृतीबंधानुसार अनेक पदे रिक्त, स्तिथी सुधारायला लागणार अनेक वर्ष, ठोस निर्णयाची गरज
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक, डॉक्टर इतर तंत्रज्ञ व इतर अधिकारी कर्मचारी यांची अनेक पदे रिक्त असुन रुग्णसेवा पुरवायची कशी असा प्रश्न आरोग्य यंत्रणेसमोर उभा राहिला आहे. एकीकडे औषधे व इतर सेवाभुत सुविधा नसल्याने रुग्णाचे हाल होत असतानाच रिक्त पदांचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे.
कोणतीही पायाभूत सुविधा किंवा कर्मचारी यांचा आकृतीबंध याची पूर्तता न करता वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करण्याची गडबड तत्कालीन सरकारने का केली ? की पीपीपी मॉडेल हे कसे यशस्वी आहे हे दाखविण्याचे वारंवार अडथळे आणले जात आहेत यासह इतर श्रेयवादात प्रथेप्रमाणे विकास रखडला आहे.
वैद्यकीय महाविद्यालय येथील प्राध्यापक व इतर स्टाफच्या पगारी 4 महिन्यापासून थकीत असुन जवळपास हजार पदे रिक्त आहेत. 10 ऑक्टोबरपर्यंत हा प्रश्न सोडवला नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेने दिला असुन त्याला अद्याप सरकारने गंभीर्याने घेतलेले दिसत नाही.नेहमी आश्वासानावर बोळवन केली जाते.
धाराशिव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राध्यापक, डॉक्टर व इतर कर्मचारी यांची जवळपास 50 टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. स्वतंत्र रुग्णालय नसतानाही वैद्यकीय महाविद्यालय सुरु केले गेले शिवाय आता नवीन जागा व अधिकारी कर्मचारी यांचा आकृतीबंध मंजुर झाला असला तरी त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी काही वर्ष लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे काही काळ कळ सोसावी लागणार आहे. तात्काळ निर्णय व लोकरेट्यासह ठोस निर्णयाची गरज आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तातरीत झाले. रुग्णालयात साधी साथीच्या रोगाची औषधे नसल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या पाहणीत समोर आले, खुद्द भारती ह्या रुग्ण बनून रांगेत गेल्यावर त्यांना सुद्धा औषधे नसल्याचे सांगण्यात आले, हाच अनुभव अनेक लोकप्रतिनिधी यांना आला. सामान्य रुग्णाच्या तर हा अनुभव जणू पाचवीला पुजलेलाचा आहे
काही अडचण आली किंवा टीका झाली की जिल्हा शासकीय रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाकडे येते हे सांगून जबाबदारी झाटकण्यात आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत धन्यता मानतात व उलट पत्रकार यांना ज्ञानाचे, उपदेशाचे डोस पाजतात.
परंपरागत विरोधक व हाडवैरी असलेले खासदार ओमराजे व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील एकमेकांवर टीका व उणीवा काढण्यात समाधान मानतात तर इतर नेते खेचण्यात. ठोस निर्णय व उपाययोजना याची गरज आहे तरच रुग्णसेवा सुधारेल.