धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे पोलिसांनी कारवाई करीत एकाला एमडी ड्रग्जसह पकडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, तुळजापूर, धाराशिव, उमरगा यासह अन्य भागात एमडी ड्रग्ज उघडपणे मिळत असल्याची चर्चा व माहिती होती. अखेर पोलिसांनी एकास रंगेहात पकडले आहे. जवळपास 7-8 ग्राम ड्रग्जसह एकाला ताब्यात घेतले असुन गुन्हा नोंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एमडी ड्रग्ज विरोधात कारवाईस सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागले.
‘मेफेड्रोन’ असे नाव असलेला हा अंमली पदार्थ 2 हजार 500 रुपये प्रती 10 ग्रॅम दराने मिळत आहे. मेफ, बबल्स, ड्रोन, म्यॅव म्यॅव आणि एम-कॅट अशी वेगवेगळी नावे आहेत. युवा वर्गाला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक असुन याचे दूरगामी शरीरावर परिणाम आहेत, अनेक तरुण या ड्रग्जच्या नशेच्या आहरी गेलेले आहेत, तुळजापूर येथील काही जणांना तर व्यसनमुक्ती सारख्या ड्रग्ज नशामुक्ती केंद्रात भरती करावे देखील लागले आहे तर परंडा येथे नागरिकांनी मोर्चा काढत निवेदन देत माफियाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती, त्यानंतर आता एक जण गळाला लागला आहे.
परंडा येथे सापडलेला ड्रग्ज कुठून आला ? तस्कर कोण ? याचा तपास पोलीस करीत आहेत. धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगार व गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असुन बोगस दारू तस्करी, ड्रग्ज, बंदूकबाजी, वेश्या व्यवसाय या विश्वात अनेक जण गुंतले आहेत. लोकप्रतिनिधी व गावपुढारी, नेत्यांनी ड्रग्जचा सारखा गंभीर विषय राजकारणाच्या पलीकडे जाऊन हाताळणे गरजेचे बनले आहे. ग्रामीण भागात तळापर्यंत ड्रग्जने पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहेत, त्याला वेळीच आळा घालणे समाजहीतासाठी गरजेचे आहे.
धाराशिव जिल्ह्या शेजारी असलेल्या सोलापूर, पुणे या भागातून ड्रग्ज माफिया पेडलर मार्फत छोट्या 10 ग्रामचे पॉकेट करुन ड्रग्ज पुरवठा करीत आहे. अनेक जणांना हळूहळू नशा व व्यसन लागले आहे. ड्रग्ज आणून देतो असे सांगत काही जणांची यात लाखों रुपयांची फसवणूक झाली आहे मात्र चोरीचा मामला असल्याने सगळे चिडीचुप आहे.
परंडा येथील कारवाई पोलीस निरीक्षक विनोद ईजपवार यांच्या मार्गदर्शनात सपोनि कविता मुसळे,पोहेकॉ रफीक मुलानी, वाय जी यादव,पोना बळी शिंदे,पीएसआय के के कांबळे यांनी केली. आरोपी इम्रान बशीर शेख याला ताब्यात घेऊन एक कार व ड्रग्ज असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.