ठेवीदार यांच्या हक्कासाठी दैनिक समय सारथीचा पाठपुरावा
धाराशिव – समय सारथी
वसंतदादा बँक घोटाळ्यात चेअरमन तथा मुख्य सूत्रधार आरोपी विजय नाना दंडनाईक यांनी अखेर शरणागती पत्कारल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती.धाराशिव येथील कोर्टाने त्यांना 25 जानेवारी गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली, पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे आता त्यांची रवानगी धाराशिव जेलमध्ये करण्यात आली आहे. बँक घोटाळ्यातील इतर संचालक फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी शोधमोहीम व धाडसत्र सुरु केल्यावर विजय दंडनाईक हे स्वतःहून आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाले,त्यांनंतर त्यांना अटक करण्यात आली. गुन्हा नोंद झाल्यापासून तब्बल 6 महिने ते फरार होते त्यांचा जामीन जिल्हा व संभाजीनगर उच्च न्यायालयाने नाकारला होता त्यानंतर ते पोलिसांना शरण आले.
वसंतदादा बँक घोटाळ्यात जवळपास 18 आरोपी पैकी एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नव्हते, या घोटाळ्यातील ही पहिली अटक आहे. पोलिसांनी गेल्या आठवड्यात दंडनाईक यांचे घर, कार्यालयात धाडी टाकत शोध घेतला तसेच इतर आरोपीचा ही ठावठिकाणा शोधला मात्र ते सापडले नाहीत त्यानंतर मुसक्या आवळल्यानंतर ते पोलिसांसमोर हजर झाले व त्यांना अटक करण्यात आली.
दंडनाईक व इतर काही संचालक यांचा अटकपुर्व जामीन अर्ज धाराशिव येथील न्यायाधीश किरण बागे पाटील यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र कोर्टाने जामीन नाकारणार असल्याचे सांगताच त्यांनी अर्ज मागे घेतला तर काहींचा जामीन फेटाळला. वसंतदादा बँकेच्या घोटाळ्याचा आर्थिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक संतोष शेजाळ हे तपास करीत आहे. या घोटाळ्यात दंडनाईक यांचा संचालक मुलगा पृथ्वीराज,पत्नी सुरेखा असे कुटुंब अडकले आहेत.
ज्यादा व्याजाचे आमिष दाखवून ठेवीदार यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कलम 420,409,34 सह महाराष्ट्र ठेवीदारांचा वित्तीय संस्था मधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम कलम 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रभात सहकारी बँकेने 1 कोटी 81 लाख ठेवले होते त्यांना 2 कोटी 31 लाख देणे असताना ते मुदत संपूनही दिले नाही त्यामुळे 28 जुलै 2023 रोजी गुन्हा नोंद केला आहे.
वसंतदादा बँक घोटाळ्यातील आरोपी
पृथ्वीराज विजय दंडनाईक, सुरेखा विजय दंडनाईक, गणेश दत्ता बंडगर, रामलिंग धोंडीअप्पा करजखेडे, शुभांगी प्रशांत गांधी, कमलाकर बापूराव आकोसकर,गोरोबा झेंडे, हरिश्चंद्र शेळके, इलाही बागवान, प्रदीप कोंडीबा मुंडे, लेखापरीक्षक भीमराव ताम्हाणे,विष्णुदास रामजीवन सारडा, व्यवस्थापक दीपक देवकते, महादेव गव्हाणे,लक्ष्मण नलावडे, सुरेश पांचाळ, नीलम चंपतराय अजमेरा हे आरोपी आहेत.