धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणसाठी 23 ते 31 जानेवारी दरम्यान घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार असुन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी नागरिकांना महत्वाचे आवाहन केले आहे.
राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करुन (इंम्पेरिकल डेटा) माहिती संकलित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग यांना निर्देश दिलले आहेत त्यानुसार मागासवर्ग आयोग यांचेकडून प्राप्त सूचनांनुसार धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी व माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रगणक व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या सर्वेक्षणाचे काम हे 23 जानेवारी ते 31 जानेवारी असे 9 दिवस करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या कालावधीत या कामासाठी नियुक्त प्रगणक हे गावातील, शहरातील प्रत्येक कुटंबास भेट देऊन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून देण्यात आलेल्या प्रशावलीनुसार मोबाईल अॅपद्वारे माहिती संकलित करणार आहेत. तरी या सर्वेक्षणादरम्यान कुटुंब प्रमुखांनी घरी थांबुन आपली माहिती प्रगणकांना देण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
सर्वेक्षण करताना ऑनलाइन माहिती भरत असताना खुल्या प्रवर्गाचा व्यक्ती असेल तर 121 प्रश्न संच असलेला फॉरमॅट आवश्यक माहिती भरण्यासाठी कार्यरत होईल. या सर्वेक्षणाची माहिती भरताना ती चार भागामध्ये असणार आहे. पहिल्या भागात संबंधित व्यक्तीची मुलभूत माहिती जसे- आधार कार्ड, पॅनकार्ड इ., दुसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची सामाजिक माहिती, तिसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची शैक्षणिक माहिती व चौथ्या भागात संबंधित व्यक्तीची आर्थिक माहिती असणार आहे. उक्त प्रमाणे 121 प्रश्नसंचाची माहिती पूर्ण भरल्यानंतर सिस्टीमवर कॅमेरा ऑन होवून संबंधित व्यक्तीचा फोटो व स्वाक्षरी घेण्यात येवून त्याची ही माहिती संगणक प्रणालीवर जमा होणार आहे.