पहा गॅझेट – 1901 साली धाराशिव जिल्ह्यात होती 2 लाख मराठा/कुणबी लोकसंख्या
धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत असुन मनोज जरांगे पाटील हे मराठा जागृती शांतता रॅली सुरु करीत आहेत. मराठा व कुणबी हे एकच असुन सरसकट मराठा आरक्षण द्यावे अशी प्रमुख मागणी आहे, त्यात हैद्राबाद गॅझेटमध्ये मराठा व कुणबी एक असल्याच्या नोंदी असल्याने ते गॅझेट स्वीकारावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. हैद्राबाद गॅझेटचा शोध सुरु असुन त्यासाठी महाराष्ट्र सरकारने तीन पत्र हैदराबादच्या मुख्य सचिवांना देत पत्रव्यवहार केला असुन ऑफिशियल कॉपी मागितली आहे असे उत्तर सरकारने विधीमंडळात दिले आहे. अनेक जिल्हाधिकारी कार्यालयात त्या गॅझेटची कॉपी असताना सरकारला मात्र ती सापडेना झाली आहे. गॅझेट शोधासाठी शिंदे समिती 8 जुलैला हैद्राबादला जाणार असुन मराठा व कुणबी एकच असल्याच्या नोंदी तपासणार आहे.
1901 सालीच्या गॅझेटमध्ये धाराशिव जिल्ह्यात 2 लाख मराठा कुणबी लोकसंख्या असल्याच्या नोंदी आहेत. ब्रिटिश यांच्या इम्पेरियर गॅझेटीयरमध्ये पान क्रमांक 262 व 263 वर जात व व्यवसाय या परिच्छेदात The Most Numerous Caste is that of the Kunbis (Maratha) who number 2 lakh 5 thousand or 38 % Of the Total Population. ही महत्वाची नोंद सापडली आहे. गुलबर्गा विभागात धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तुळजापूर, परंडा हे सध्याचे तालुके व तत्कालीन नळदुर्ग तालुका व औसा हा भाग होता.त्यवेळी 6 शहरे व 860 गावे होती त्यात 1901 साली 5 लाख 35 हजार लोकसंख्या होती, 58 टक्के लोकांचा व्यवसाय हा शेती होता. कुणबी म्हणजे मराठा अशी महत्वाची नोंद सापडली आहे.
हैदराबाद गॅजेट लागू करा अशी मनोज जरांगे यांची मागणी होती. आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 13 जुलैपर्यंत वेळ मागितला आहे.तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे उत्तर शंभुराज देसाई यांनी विधीमंडळात दिले. 5 लाख पेक्षा जास्त नुकसान झाले ते गुन्हे मागे घेता येत नाही, असे आम्ही जरांगे यांना सांगितले आहे. बाकीच्या गुन्ह्यांसंदर्भात देखील उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. असे ते म्हणाले.
राज्य सरकारने कुणबी नोंदींचे राज्यात 28 हजार दाखले प्रलंबित आहेत, ते पूर्ण करण्याच्या सूचना तात्काळ यंत्रणांना दिले आहेत. आपण 10 टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा केला आहे. या कायद्याला आजून तरी कोर्टाने स्थगिती दिली नाही. सगे सोयाऱ्यांचे काय तर मुख्यमंत्री स्वतः मोर्चाला सामोरे गेले. शब्द दिल्याप्रमाणे ड्राफ्ट तयार केला त्यावर हरकती 8 लाखापेक्षा जास्त हरकती आल्या आहेत,त्याची छानणी करण्यासाठी किमान 1 महिना लागेल असे देसाई यांनी सांगितले.