धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषण व आंदोलनास प्रत्येक जण आपआपल्या स्तरावर पाठिंबा देत आहे. अनेक जन मुंबई येथे गेले आहेत पण ज्यांना शक्य नाही ते रसद पुरवून वेगवेगवेगळ्या मार्गाने जबाबदारी पार पाडत आहेत. गौरी गणपतीची सण असल्याने महिलांना मुंबई येथे इच्छा असतानाही जाता येत नसल्याने त्यांनी गौरी देखाव्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा देखावा तयार करून एक प्रकारे पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचा देखावा धाराशिव येथील सौ शैला प्रसाद दसपुते व त्यांच्या मुली कृतिका आणि पल्लवी यांनी उभा करून मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. या जिवंत देखाव्यातून त्यांनी आरक्षण संदेश व समाजजागृती केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा बांधवानी ठिय्या आंदोलन केले होते, त्यावेळी शेतातील बैलगाडीसह मुक्काम करून जेवण केले होते, त्यासह आजवर झालेल्या आंदोलनाचा देखावा दसपुते कुटुंबाने साकारला आहे, त्यामुळे आंदोलनाच्या आठवणी जाग्या होऊन प्रेरणा मिळत आहे.

