उमरगा – समय सारथी
हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारून मराठा समाजाला कुणबी मराठा प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी कवठा येथे कवठा ग्रामस्थांच्यावतीने गाव बंद आंदोलन करून विद्यमान सरकारला येणाऱ्या विधानसभेत मतदान न करण्याची शपथ घेण्यात आली . मराठा आरक्षणा साठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक मराठा समाजाचा आरक्षणाकरीता छळ करित असल्याचा आरोप उपोषणकर्ते विनायकराव पाटील यांनी यावेळी केला.
कवठा येथे समाजसेवक विनायकराव पाटील हे 17 सप्टेंबर पासून हैद्राबाद गॅझेटियर स्वीकारून मराठवाडयातील मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी उपोषण करित आहेत. त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. वयाच्या 75 व्या वर्षी पाटील यांनी अन्नपाणी त्याग उपोषण सुरू केल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.
पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी कवठा ग्रामस्थांनी गांव बंद अंदोलन करून विद्यमान सरकारला सत्तेतून पायउतार करण्याची शपथ घेतली.
कवठा ग्रामस्थांच्यावतीने येथील विष्णू मंदिरापासून भव्य आरक्षण रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत गावांतील ग्रामस्थां सह शाळकरी विद्यार्थी महिला मुलींची मोठया संख्येनि उपस्थिती होती. रॅलीचा समारोप उपोषणस्थळी झाला.यावेळी विजयकुमार सोनवणे,अतुल सोनवणे , विकास पाटील,मलंग गुरुजी यांची भाषणे झाली.विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाचे राजेंद्र सोनवणे , सतीश पवार , अलका माने, शोभा सोनवणे, मंगल माने, यांनी अभंग गायनातून मराठा आरक्षणाची मागणी केली. तानाजी सोनवणे , गणेश सोनवणे, भागवत सोनवणे आदि सह ग्रामस्थांची मोठया संख्येनि उपस्थिती होती.
विनायकराव पाटील म्हणाले की, आरक्षण देण्याच्या कारणावरून सरकारकडून जाणीवपूर्वक मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. 371 कलमाप्रमाणे मराठवाडयातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद असतानाही आरक्षणा पासून गेल्या चाळीस वर्षापासून मराठा समाज विविध अंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून न्याय मागणी करीत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच रहाणार आहे. आरक्षणासाठी देहत्याग करण्याचा निर्धार केल्याचे पाटील यांनी सांगितले. आता कसल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशी शपथ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची त्यांनी या वेळी घेतली.