10 जुलैला धाराशिव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शांतता रॅली
धाराशिव – समय सारथी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीची घोषणा केली असुन 10 जुलै रोजी जरांगे पाटील हे धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. या शांतता रॅलीच्या नियोजनासाठी धाराशिव जिल्हा नियोजन बैठकीला समर्थ नगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सुरुवात झाली आहे. मराठा मावळे एकत्र झाले असुन या बैठकीत शांतता रॅलीची दिशा ठरत असुन अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. सभा स्थळी भगवे वादळ निर्माण झाले आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅलीची घोषणा केली आहे. आमरण उपोषण नंतर त्यांनी या रॅलीची घोषणा केली असुन 6 जुलै रोजी हिंगोली पासुन या रॅलीला सुरुवात होणार आहे. 7 जुलै परभणी, 8 जुलै नांदेड, 9 जुलै लातूर, 10 जुलै धाराशिव, 11 जुलै बीड,12 जुलै जालना व 13 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शांतता रॅली निघणार आहे, या रॅलीचे नियोजन करण्यासाठी मराठा समाजाने सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील सर्व मराठा एका ठिकाणी एकत्र येणार आहे, कोणीही विखरून थांबणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.