रणनितीसाठी नियोजन बैठक, महत्वाचे निर्णय व समित्या गठीत होणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीची मराठा समाजाने तयारी सुरु केली असुन गावोगावी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. धाराशिव जिल्हा लोकसभेची नियोजन बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय व विषयावर चर्चा झाली. धाराशिव बरोबरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी येथे सुद्धा लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा मतदार संघ निहाय व त्यावर नियंत्रण व समन्व्यसाठी विविध समित्या तयार करण्यात येणार आहेत.
भुम, वाशी, परंडा, उमरगा, लोहारा, तुळजापूर, कळंब, धाराशिव व बार्शी आणि औसा या 10 तालुक्यात बैठका होत आहेत. तुळजापूर तालुक्यातील सावरगाव या गावात बैठक घेऊन 3 उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला असुन त्यासाठी उमेदवार खर्च हा लोकवर्गणीतुन केला जाणार आहे. मोर्डा येथे मराठा समाजाची बैठक होत असुन अनेक ठिकाणी गावोगावी अश्या बैठका व ठराव घेतले जात असुन निवडणुकीचे नियोजन सुरु आहे. काही ठिकाणी गावात उमेदवार सुद्धा जाहीर केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असुन बार्शी व औसा या तालुक्यातील जवळपास 150 पेक्षा जास्त गावे आहेत त्यामुळे 1 हजार उमेदवार उभे केले जाणार आहेत. मराठा समाजाने निवडणुकीसाठी विविध समन्व्य समित्याचे गठन करण्यात आले. प्रत्येक गावातून एक उमेदवार मराठा समाजाच्या वतीने अर्ज भरणार असल्याचे यात ठरले. मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असुन सरकारला इशारा म्हणून उमेदवारी भरून हे आंदोलक केले जात आहे.
384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक घ्यावी लागते. एका मतदार संघात 24 मशीन उपलब्ध होऊ शकतात त्यात एका ईव्हीएम मशीनमध्ये 16 उमेदवार असे 384 उमेदवार बसू शकतात त्यानंतर अधिक उमेदवार झाल्यास मतपत्रिकेवर मतदान घ्यावे लागते. एका अपक्ष उमेदवार याला अर्ज भरण्यासाठी ओपन खुल्या गटातून 25 हजार डिपॉझिट अनामत रक्कम व इतर गटातून 12 हजार 500 रुपये लागतात तर उमेदवारी अर्ज भरताना 10 मतदार सुचक म्हणून लागतात.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी मराठा समाज आक्रमक आहे. मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाची मागणी असुन समाज आक्रमक असुन हे नवीन आंदोलन सुरु केले आहे. या बैठकीला समाज बांधव मोठ्या संख्याने हजर होते.
धाराशिव बरोबरच वाराणसी येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मराठवाडा व महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत 1 हजार उमेदवारी अर्ज भरण्याचा इशारा दिला आहे. कवठा येथील मराठा आरक्षण आंदोलक विनायकराव पाटील यांनी इशारा देत वाराणसीत आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. मराठवाड्यातील हैद्राबाद गॅझेट स्वीकारून सरसकट कुणबी मराठा आरक्षण देण्याची मागणी आहे.आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित करुन आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत.मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण देण्याची मागणी आहे.