धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करीत आहेत. या आंदोलनात धाराशिव जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव सहभागी झाले आहेत, या आंदोलकांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मोलाची मदत करीत आंदोलन व मराठा आरक्षण मागणीला एकप्रकारे पाठिंबा दिला आहे.
आंदोलकांसाठी तेरणा एकप्रकारे आधार ठरत आहे. पावसाचे दिवस असल्याने अनेक आंदोलक इथे राहून नंतर आंदोलनात सहभागी होत आहेत. नेरुळ ते आझाद मैदान हे अंतर अंदाजे 1 तासाचे असल्याने अनेकांची इथे सोय करण्यात आली आहे, जोपर्यंत आंदोलन सुरु आहे तोपर्यंत इथे व्यवस्था केली जाणार असुन यावर लक्ष व नियोजनासाठी वेगवेगळ्या स्वयंसेवकांच्या टीम तयार करण्यात आल्या आहेत.
मुंबई नेरुळ येथील तेरणा येथील संकुलात आमदार पाटील, मल्हार पाटील यांनी निवास, भोजन, वाहन पार्किंग, वैद्यकीय अशी व्यवस्था करून इथे स्वतंत्र यंत्रणा मदत कार्यासाठी नेमली आहे. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सकल मराठा समाजबांधव लाखोंच्या संख्येनं मुंबईत दाखल झाले आहेत. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी तेरणा परिवार कामाला लागला आहे. आजवर मराठा आरक्षण आंदोलन लढ्यात वेळोवेळी आमदार पाटील यांनी मदत करीत जबाबदारी पार पाडली आहे.
नवी मुंबई येथील नेरुळच्या तेरणा विद्यालय आणि जुनिअर कॉलेज परिसरात धाराशिवसह सबंध मराठवाड्यातून आलेल्या आपल्या बांधवांची तेरणा परिवाराच्या माध्यमातून सर्वतोपरी सोय करण्यात आली आहे. कोणत्याही अडचणी आल्यास अथवा कोणत्याही प्रकारचे तातडीचे सहकार्य हवे असल्यास संपर्क साधावा असे आवाहन देखील केले आहे.