धाराशिव – समय सारथी
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिव येथील तरुण संतप्त झाला असुन रस्त्यावर उतरला आहे. सोमवारचा दिवस मराठा समाजाने विविध आंदोलने करीत गाजवला, जलसमाधी व रास्ता रोको आंदोलन करीत तरुणांनी मराठा आरक्षण देण्याची व सरकारने जारांगे यांचे आमरण उपोषण स्थगित करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली.
जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असुन त्यांची प्रकृती साथ देत नाही त्यामुळे सरकारने वेळ वाया घालू नये. तात्काळ त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. या मागणीसाठी धाराशिव येथील हातलाई तलावात सकाळपासून मराठा बांधवांचे जलसमाधी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत खोल पाण्यात जातच रहाणार असा इशारा आंदोलकांनी दिला त्याप्रमाणे ते पाण्यात जवळपास 10 तास उभे राहिले, त्यानंतर काही तरुणाची प्रकृती ढासळली त्यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतप्त तरुणांनी रास्ता रोको करीत निषेध केला.
मराठा तरुणांनी अचानक जलसमाधी आंदोलन सुरू केल्याने प्रशासन व पोलीस यांची चांगलीच धावपळ उडाली. आरोग्य विभाग,अग्नीशामन, पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यावर तरुणांना बाहेर येण्याची विनंती केली मात्र तरुण आपल्या मागण्यावर ठाम राहिले.