जरांगे पाटील यांच्याशी बोलणार – नंतर आरक्षण भुमिका स्पष्ट करणार – मराठा आंदोलक ठाम
धाराशिव – समय सारथी
राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण बाबत भुमिका स्पष्ट करावी या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले त्यानंतर त्यांनी राज ठाकरे मुक्कामी थांबलेल्या पुष्पक पार्क या हॉटेलमध्ये तब्ब्ल 3 तास ठिय्या आंदोलन केले. आक्रमक आंदोलनानंतर राज ठाकरे व मराठा आंदोलक यांची आमनेसामने चर्चा झाली. मराठा आरक्षण बाबत मी मनोज जरांगे पाटील यांच्या सविस्तर बोलेन आणि त्यानंतर माझी व पक्षाची भुमिका स्पष्ट करेल असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी लवकर भुमिका स्पष्ट न केल्यास आम्ही पुन्हा त्यांच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा मराठा आंदोलक यांनी दिला. आम्ही तात्पुरते आंदोलन मागे घेत असुन भुमिका स्पष्ट न केल्यास आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे व त्यांच्या टीमने समंजस्याची भुमिका घेत राज ठाकरे व आंदोलक यांची भेट घडवून आणली, त्यांची मध्यस्थी यावेळी कामी आली.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे आशीर्वाद घेऊन राज ठाकरे यांनी धाराशिव जिल्हा दौऱ्याला सुरुवात केली. धाराशिव येथील पुष्पक पार्क येथे राज ठाकरे येथे आल्यानंतर मराठा आंदोलक त्यांना भेटण्यासाठी आले व त्यांनी भेटीची वेळ मागितली. राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणबाबत भूमिका स्पष्ट करावी व राज ठाकरे यांनी वक्तवय केले होते की मराठा तरुणांची माथी भडकवली जातील याबाबत स्पष्टीकरण द्यावे.
राज ठाकरे यांनी सुरुवातीला मराठा आंदोलक यांची भेट नाकारल्याने आंदोलक हे आक्रमक झाले व तिसऱ्या मजल्यावर जाऊन घोषणाबाजी व ठिय्या मांडला त्यावेळी राज ठाकरे स्वतः खाली आले व आंदोलक यांना चर्चा करायची असेल तर वर या असे सांगितले. एका अंगरक्षकाने उद्धट वर्तन केल्याने वातावरण चिघळले व आंदोलन सुरु झाले.
मराठा आरक्षण आंदोलकांनी घोषणाबाजी करुन परिसर दणाणुन सोडला. राज ठाकरे चा पक्ष वाढवायला कोण मराठा, टोल नाके फोडायला कोण मराठा,बंद करायला कोण मराठा,आज ही मराठा समाजाचे अवस्था काय केली पहा, खाली या खाली या राज ठाकरे खाली या यासह राज ठाकरे हे सुपारीबाज असल्याचा आरोप घोषणाबाजीत केला.