धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सर्व मराठ्यांनी मुंबईला यावे, मराठ्यांवर जर हात उगारला तर त्याचे परिणाम केंद्रातील मोदी व राज्य सरकारला भोगावे लागतील असा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. जो मुंबईला येणार नाही तो आपला नाही, खोड्या करण्याऱ्यांची नावे सांगा त्यांचा बाजार उठवू, ही शेवटची लढाई असुन आता माघार नाही असा निर्धार पाटील यांनी केला, ते धाराशिव दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला.
29 ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्शवभुमीवर त्यांनी प्रत्यक्ष गाठी भेटी दौऱ्याला धाराशिव येथून सुरुवात करीत आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. सर्वच्या सर्व मराठे ओबीसीमध्ये समाविष्ट झालेले या आंदोलनानंतर दिसतील, आता कोणत्याही स्तिथीत मुंबईवरून माघार घेतली जाणार नाही, असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
सरकारने एकदा लाठीचार करून चुक केली आहे, आमच्या आई बहिणीवर हल्ला केला, गोळीबार करण्यात आला, अमानुष मारहाण केली. आता पुन्हा ती वेळ येऊ देऊ नका. ती घटना आठवली की माझे काळीज अजुन चिरर होते. पुन्हा ती चुक किंवा आडवा आडवी करू नका, मराठ्यांचा नाद केला तर गावागावातील पानंद रस्ता सुद्धा आडवला जाईल. मराठ्यांना काही केले तर त्याची किंमत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारला मोजावी लागेल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. फडणवीस यांना ती खोड आहे, त्यांना जनतेविषयी प्रेम नाही त्यामुळे ही धमकी नसुन मी प्रामाणिकपणे सांगत आहे. मराठे कोणत्याही टोकाला जाऊ शकतात. तुमच्यामुळे मोदी सरकारला सुद्धा हदरा बसेल असे ते म्हणाले. सरकारचा कोणताही निरोप नाही, त्यांच्याशी वारंवार चर्चा करण्याची इच्छा नाही.
समाजाने अनेक लोकप्रतिनिधी यांना मोठे केले,आता आमच्या मुलांच्या हक्काची, कल्याण करण्याची वेळ आहे त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती, आजी माजी आमदार खासदार यांनी मुंबईला यावे, कोण येते किंवा नाही यावर आमचे लक्ष असेल, जे येणार नाहीत त्यांना नंतर त्यांची जागा दाखवू असा इशारा दिला. आमच्यात नसणारा तो आमचा नाही हा संदेश आम्ही देणार आहोत असे ते म्हणाले. मी झुंजणार व हरवणार आणि समाजाला न्याय देणार, यावेळी आम्ही ओबीसीमधुन आरक्षण घेऊन गुलाल उधळणार, मराठा हरू देऊ नका, दोन ते 3 दिवस वेळ काढुन मुंबईला या असे ते म्हणाले. 58 लाख नोंदी सापडल्या असुन सव्वा तीन कोटी मराठे ओबीसीमध्ये आले आहेत.
हैद्राबाद व सातारा संस्थानचे गॅझेट आहे, त्यात मराठा कुणबी असल्याच्या नोंदी आहेत. जुना मुंबई परगणामध्ये मराठा व कुणबी एकच असल्याच्या नोंदी आहेत. आता ही शेवटीची आरपारची अंतीम लढाई आहे, न भुतो न भविष्यती असा लढा असणार असुन त्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईला या, काम व सणवार आहे म्हणुन घरी बसून नका आयुष्यभर सण येतील मात्र ही शेवटची लढाई आहे, त्यामुळे मुंबईकडे चला असा नारा दिला. प्रत्येक तालुक्यातून 50 हजार गाड्या निघणार असुन तसे नियोजन सुरु आहे असे ते म्हणाले. गणपती विसर्जन मुंबईच्या समुद्रात करा पण सण आहे म्हणुन घरी बसू नका.
ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याच्या सगेसोयरे यांना प्रमाणपत्र द्या, त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार झाला आहे. सगेसोयरे अधिसूचना, गॅझेट लागु करून अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी असणार आहे. एकदा अंतरवली सराटी सोडली सोडली की पुन्हा माघार नाही त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुणबी व मराठा एक आहे असा अध्यादेश काढावा व सगळ्या मागण्या मान्य कराव्यात असे सांगितले.
गोरगरीब मराठ्यांची लढाई असुन ती सगळ्यांनी लढायची आहे व जिंकायची आहे. जर एखादा आमदार यात कुजबुज केली व अडथळा आणला तर फक्त त्याचे नाव सांगा मी त्याचा बाजार उठवला म्हणुन समजा. एखाद्या नेत्याचे ऐकून मुंबईला यायचे टाळू नका. 4-5 लाख रुपयाच्या कामासाठी अडवणूक केली जात आहे, दबाव टाकला जात असेल तर त्याचे सुद्धा नाव सांगा, त्याचा बाजार उठवू. वयक्तिक फायदा, नेत्याचे ऐकून घरी बसू नका, मुला बाळांचे कल्याण करण्यासाठी एक व्हा.
काही सत्ताधारी लोक मला बोलतात, सांगतात की आम्ही तुमच्या सोबत आहोत. सरकारमधील काही जन खुनशी बुद्धिचे, काडीबहाद्दर आहेत. आम्ही तुमच्या सोबत दिसणार नाही मात्र मुंबईच्या आंदोलनात येऊ, तिथे दिसू अशी भूमिका घेतली आहे. सगळे मराठे आतून एक झाले आहेत. सत्ता आली म्हणुन सुधारणा होणार नाही, सत्ताधारी पक्षातील लोकांनी सुद्धा मुलासाठी या आरक्षण लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. मी तुमच्यासाठी झटत आहे, तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा, सगळे भानावर या, मतभेद बाजूला ठेवा. 75 वर्षात अशी संधी पहिल्यादा आली आहे त्यामुळे सहभागी व्हा असे ते म्हणाले.
धाराशिव व सोलापूर येथील मराठा नोंदी व जात वैधता प्रमाणपत्र बाबत विशेष पाठपुरावा सुरु असुन मंत्री संजय सिरसाठ यांनी बैठक घेतली आहे. जिल्हाधिकारी यांना सूचित केले आहे.