धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांनी आंतरवली सराटी येथे जात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व निवडणुकीसह विविध मुद्यावर चर्चा केली. मराठा उमेदवार म्हणुन उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे.
काँग्रेस पक्षाने ऍड धीरज पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मधुकरराव चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. पक्ष श्रेष्टी यांनी माझ्यावर अन्याय केला असे सांगत त्यांनी कार्यकर्ते व समर्थक यांच्या आग्रहास्तव तुळजापूर विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. चव्हाण हे अपक्ष निवडणुक लढविणार आहेत, त्यासाठी उद्या मंगळवारी नळदुर्ग रोड वरील श्रीनाथ लॉन्स येथील सभागृहात कार्यकर्ते व समर्थक यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तुळजापूर मतदार हा सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1978 व 1985 ची निवडणूक शेकापच्या माणिकराव खपले यांनी जिंकली. मात्र, उर्वरित काळात येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मधुकरराव चव्हाण 1990 साली पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून आमदार झाले. त्यानंतर 1999 ते 2014 पर्यंतच्या 20 वर्षाच्या काळात ते कायम आमदार राहिले. 2019 च्या निवडणुकीच्या आखाड्यात ते पराभूत झाले.
मधुकरराव चव्हाण हे 25 वर्ष आमदार राहिले व ते काँग्रेस सरकारच्या काळात पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्रीही राहिले. तुळजापूर मतदार संघ व आमदार चव्हाण असे गणित बनले होते मात्र धाराशिव मतदार संघ बदलून तुळजापूर येथे पहिल्यांदा उभे राहिलेले भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी चव्हाण यांचा पराभव केला. 2019 मध्ये राणाजगजीतसिंह पाटील यांना 99 हजार 34 मते तर चव्हाण यांना 75 हजार 865 मते पडली, 23 हजार 169 मतांनी पाटील विजयी झाले. तुळजापूर मतदार संघात 3 लाख 82 हजार 467 मतदार असुन गेल्या 2019 च्या निवडणुकीत 3 लाख 51 हजार 842 मतदार होते, 30 हजार 625 मतांची वाढ झाली आहे.
कार्यकर्ते, माझे समर्थक जे निर्णय घेतील तो मला मान्य असेल. 60 वर्ष मी काँग्रेस पक्षात राहून सेवा केली मात्र पक्षाने मला जाणीवपूर्वक उमेदवारी दिली नाही. काही जणांनी राजकीय षडयंत्र रचले त्यांची नावे मी योग्य वेळी उघड करेल. 70 टक्के पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मला पाठिंबा आहे, त्यांचा कौल जाणून घेऊन निर्णय घेणार असल्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बोलताना सांगितले.