धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. तात्कालीन उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे,मंडल अधिकारी व तलाठी या तिघा विरोधात आनंदनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नियम बाह्य असल्याचा दावा करत महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करत आहेत, या सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली यानंतर पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे, यानंतरही महसूल कर्मचारी व अधिकारी आंदोलनावर ठाम आहेत.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असुन त्यांनी दंडाधिकारी अधिकाराने पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्र लिहीत आदेश दिले आहेत. गुन्हा नोंद करताना व त्यानंतर अटक करताना अनेक नियम पाळले नाहीत याबाबत अनेक कायदेशीर संदर्भ जिल्हाधिकारी यांनी पत्रात दिले आहेत. पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करुन त्याचा अहवाल दोन दिवसात सादर करावा असे म्हणटले आहे.