उमेदवारीबाबत लुडबुड करुन नका – कानाला लागलेल्या नेत्यांना दिला सज्जड दम, महायुती मेळाव्यात सावंत यांचीच हवा
धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी महायुतीच्या जिल्हा पदाधिकारी मेळाव्यात तुफान फटकेबाजी करीत नेत्यांचे कान टोचले, आपल्या रोखठोक व स्पष्ट वक्तृत्वाने मंत्री सावंत यांनी महायुतीच्या सभेचे मैदान मारत कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे मन जिंकले. सावंत यांनी विरोधकांवर जोरदार चौफेर टिका करीत एक प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळच आज फोडला. महायुतीच्या मेळाव्यात मंत्री सावंत यांनी रोखठोक भाषण केल्याने त्यांच नेतृत्व सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते यांना चांगलेच भावले. विकासाचे व्हिजन व तात्काळ निर्णय क्षमता, तळागाळातील नागरीक व कार्यकर्ते यांचा विचार ही त्यांची जनमानसात ओळख आहे.
पडलेल्या आमदाराला खासदार करुन जीवदान देत 1 लाख 28 हजार मतांनी निवडणुन आणले. 2019 च्या निवडणुकीत ओमराजे हे अपघाताने कोणाला तरी फसवून खासदार झाले, बापासारखे मी वागून मला धोका दिला. ओमराजे यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील जनतेसाठी केंद्रातून एक तरी योजना आणली का ? एखादी योजना आणली असेल तर ते सांगावे हे माझे त्यांना चॅलेंज आहे असे पालकमंत्री डॉ सावंत यांनी सांगत खासदार ओमराजे यांना आव्हान दिले. कोणी थापा मारत असेल तर त्याची जागा चौकात दाखवा असेही ते म्हणाले, त्यानंतर कार्यकर्ते यांनी घोषणा व टाळ्या वाजवत समर्थन केले.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह इतर बाहेरच्या नेत्यांनी धाराशिव जिल्ह्यात उमेदवारीच्या फंदात पडू नये व अश्या नेत्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी साथ देऊ नये, साथ देणाऱ्यांनी ते स्वतः 2024 मधुन आमदार कसे होतात हे पाहावे असे कान टोचत मंत्री सावंत यांनी सज्जड दम दिला. कानाला लागलेल्या लोकप्रतिनिधी व नेत्यांनी शांत राहावे अन्यथा माझा स्वभाव माहिती आहे मी कुठे स्फ़ोट करील हे कळणार सुद्धा नाही असे म्हणत सावंत यांनी चुळबुळ व लुडबुड करणाऱ्या नेत्यांना सबुरीचा व सुधरण्याचा सल्लाही दिला. धाराशिव लोकसभेचा उमेदवार हा धाराशिव जिल्ह्यातीलच असेल आम्हाला व जनतेला कळते काय करायचे ते असे मंत्री सावंत म्हणाले. धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारी व विकासात इतर जिल्ह्याच्या नेत्यांनी लुडबुड करु नये, आपली कुवत व औकात किती,आपण काय करतो हे त्यांनी पाहावे.
ओमराजे यांचा उललेख माजी खासदार असा केला, आता वेळ आहे त्यांनी अजुनही काम करावे व एखादी योजना आणावी. आडगाळीत पडलेले आरोग्य खाते मी वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून राबविले व आरोग्य सुधारले. निवडणुकीत अडीच ते 3 लाख मतांनी उमेदवार निवडून देऊ असा मनोदय पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्याला आजवर भावनेच्या आवाहनावर मते मागण्याचा प्रघात आहे, भावनेच्या आहरी जाऊन मतदान करणे हे पाप आहे. देशात विकासाची क्रांती झाली असुन मोदी याच्या विकासाकडे बघून राष्ट्रवादी सुद्धा आली आहे. विरोधी पक्षांतील तरुणांना सुद्धा मोदी यांचे नेतृत्व आवडत आहे. जो विकास शेताच्या बांधावर व घराच्या उंबऱ्यावर आणला त्याला नेता माना असे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सांगितले. काम केले तर लोक मते देऊन विजयी करतात असे ते म्हणाले.
विकासावर चर्चा, मागासलेल्या भागावर चर्चा व नेतृत्वाने पाऊल टाकावे. सत्तारणाची सुरुवात व मुहूर्तमेढ ही धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता बदल करुन केली, त्यानंतर राज्यात सत्तातरण केले यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठबळ दिले. विकासाच्या बाबतीत मी स्फ़ोटक आहे, मला कोणी शिव्या दिल्या तरी चालेल. विकासाचा रोड मॅप तयार असुन मविआ सरकार असतानाही कृष्णा भीमा योजनेसाठी प्रयत्न केले त्या योजनेचे 90 टक्के काम झाले असुन लोकसभा पुर्वी आम्ही पाहणी करणार आहोत.मी कोणताही निर्णय तात्काळ घेतो. बघू, करू अशी आश्वासने मी देत नाही. आकांक्षित जिल्हा असल्याने 450-500 कोटी निधीसाठी अजित पवार याबच्याकडे साकडे घातले असुन त्यांनी जास्तीत जास्त निधी देण्याचे मान्य केले आहे.चारा छावणी, पाणी टँकर सुरु होतील त्यात निधीमुळे विकासाची अडचण नको म्हणून निधी मागितला आहे. असे सावंत म्हणाले.
महायुतीचा मेळावा धाराशिव येथे संपन्न झाला यावेळी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, माजी खासदार रवींद्र गायकवाड यासह सर्व पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थितीत होते. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आठवले व खरात गट, स्वाभिमान, रयत क्रांती, भीम सेना, प्रहार जनशक्ती पार्टी, शिवसंग्राम असे 14 पक्ष हे सध्या महायुतीमध्ये आहेत. आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी केले.
महायुतीचा आवाज इतका कमी झाला आहे का असे म्हणत मंत्री डॉ सावंत हे उभे राहिल. जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम अश्या घोषणा देत त्यांनी मेळाव्यात उत्साह वाढवला.मेळाव्यानंतर मंत्री सावंत व आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी एकाच गाडीत प्रवास केला व पालकमंत्री कार्यालयात बैठक घेतली. मेळाव्यात माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना भाषण करू दिले नाही, विशेष म्हणाले गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यांना दुर्लक्षित करुन जागा दाखवली. प्रत्येक पक्षाला एक वक्ता या नियमात आमदार चौगुले यांचा नंबर लागला असे आयोजकांनी सांगितले.
महायुती फक्त लोकसभेसाठी नसुन नगर परिषद व इतर निवडणुकीसाठी आहे. नेतृत्वाने निर्णय घेतला आहे की एकत्रित काम करायचे आहे त्याची नवीन सुरुवात आजपासुन होत आहे. आपल्यात समन्वय अधिक वाढविणे गरजेचे आहे त्यासाठी समिती गठीत केली असुन त्यात सर्व घटक पक्ष प्रतिनिधी असतील. फक्त बोलून नाही तर कृतीतून एकत्र काम दाखवू असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले. पक्ष श्रेष्टी हे उमेदवार ठरवतील, तो कोणीही असला तरी प्रामाणिकपणे पुर्ण ताकतीने काम करायचे आहे कारण देशाच्या व नरेंद्र मोदी याबाबत असलेले प्रेम. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास व सबका प्रयास या चारसूत्री प्रमाणे काम करायचे असे पाटील म्हणाले.
मंत्री सावंत व आमदार चौगुले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हजारो कोटीचा निधी आला, सावंत यांच्यामुळे आरोग्य यंत्रनेत मोठा विकास झाला असे आमदार पाटील म्हणाले. नमो चषक व इतर उपक्रम सुरु असुन त्यात सहभागी व्हावे व समावून घ्यावे ही काळजी गरज आहे, जनता आपल्याला अतिशय बारकाईने पाहत आहे. मेळावा घेतला म्हणजे जनता खुश आहे असे नाही त्यांचे बारीक लक्ष आहे.इतिहास निर्माण करण्यासाठी साथ द्या असे आवाहन केले.
माझे राजकीय गुरु, शब्द प्रभु असा माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उल्लेख करीत सत्ताबदल झाल्यावर प्रगतीचा आलेख वाढत असुन दीड वर्षात जास्त निधी आला असे सांगितले. राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने ग्रामीण भागात विकास होत आहे. पिण्याचे पाणी व शास्वत पाणी 21 टीएमसी माध्यमातून मिळणार असल्याचे सांगितले, अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले.
केंद्रीय नेतृत्वाने सगळ्यावर जबाबदारी टाकली आहे, या मेळाव्याची जबाबदारी डॉ सावंत यांच्यावर टाकली असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले. बार्शी मराठवाड्याचे प्रवेशद्वार असुन बार्शी जिकडे तिकडे सरशी असे चित्र असते त्यामुळे निश्चिन्त रहा, काळजी करू नका. 700 कोटी देऊन बार्शी उपसा सिंचन योजना मंजूर झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला व अडीच हजार कोटींचा निधी दिला.
सत्ता येऊन अनेक वर्ष झाली. कार्यकर्त्यां यांना न्याय मिळावा यासाठी भविष्यात सुद्धा असेच मेळावे घ्यावे, आमदार सोबत कार्यकर्ते यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना सुद्धा न्याय द्यावा असे भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी सांगत महायुतीचा खासदार व आमदार विजयी करण्याचा संकल्प केला, आपण सुज्ञ आहेत, काळ कमी आहे त्यामुळे पाठबळ द्यावे असे सांगितले. लोकसभा, विधानसभा सोबत सर्व निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील असे सुरेश बिराजदार यांनी सांगितले, जुने इतर पक्षात असलेले सहकारी भेटल्याने बरे वाटले असे ते म्हणाले.
निवडणुकीत पडलेल्या आमदाराला मंत्री सावंत यांनी खासदार केले इतकी ताकत त्यांच्यात आहे असे सांगत शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके यांनी ओमराजे निंबाळकर यांना टोला लागवला. समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त करू असे सांगत आमचा पक्ष मजबूत आहे असे राजाभाऊ ओव्हाळ यांनी सांगितले. प्रहार संघटनेला संधी देत मला दोन आमदारात मध्ये बसविले म्हणून मी तन मन धनाने काम करेल असे मयुर काकडे यांनी संगितले.