धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद कळंब, भुम परंडा, तुळजापूर व उमरगा या 4 विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट एकास एक लढत पहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक मातब्बर नेत्यांनी दाखल केलेले अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतले. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार यांची नाराजी दुर करण्यात पक्षश्रेष्टी व नेतृत्वाला यश आले आहे. अखेर बंड थंड करण्यात महाविकास व महायुतीला यश आले आहे. पक्षश्रेष्टी व त्यांनी शब्द दिल्याने बंडाच्या तलवारी म्यान केल्या. कोणाची कोणासोबत लढत होणार हे चित्र स्पष्ट झाले असुन आखाडा पेटला आहे. 20 नोव्हेंबर ला मतदान होईपर्यंत विधानसभेचा रणसंग्राम पहायला मिळाला आहे. धाराशिव कळंब मतदार संघात 12 उमेदवार, तुळजापूर सर्वाधिक 23, परंडा 21 व उमरगा येथे 10 जण निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघातून मकरंद राजे निंबाळकर, अर्चना पाटील, सुधीर पाटील, सुरज साळुंके, शिवाजी कापसे, डॉ प्रतापसिंह पाटील, चेतन कात्रे, ऍड धनंजय धाबेकर, संजय निंबाळकर, धनंजय शिंगाडे, आनंद सतीशराव पाटील, रामदास कोळगे, नेताजी पाटील, नवनाथ दुधाळ, राहुल माकोडे, पांडुरंग कुंभार व मराठा आंदोलक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तुळजापूर विधानसभा मतदार संघात जीवनराव गोरे, मधुकरराव चव्हाण, अशोक जगदाळे, ऍड व्यंकट गुंड यांनी माघार घेतली. भुम परंडा विधानसभा मतदार संघात रणजित पाटील यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल मोटे यांना उमेदवारी देण्यात आली. उमरगा विधानसभा मतदार संघात कैलास शिंदे, दिग्विजय शिंदे व विलास व्हटकर यांनी माघार घेतली.
उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार आमदार कैलास पाटील विरुद्ध महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अजित पिंगळे यांच्यात लढत होणार आहे,इथे मनसेचे देवदत्त मोरे रिंगणात आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेसचे ऍड धीरज पाटील यांच्यात लढत होत असुन समाजवादी पार्टीकडुन देवानंद रोचकरी, वंचित बहुजन विकास आघाडीकडुन डॉ स्नेहा सोनकाटे रिंगणात आहेत. उमरगा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले विरुद्ध शिवसेना उबाठा गटाचे प्रवीण स्वामी यांच्यात सरळ लढत आहे तर भुम परंडा वाशी मतदार संघात शिवसेनाचे विद्यमान पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्या विरोधात लढत होणार
आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती. उस्मानाबाद कळंब मतदार संघात कैलास पाटील निवडुन आले त्यांना 87 हजार 488 तर राष्ट्रवादीचे संजय निंबाळकर यांना 74 हजार 021 मते पडली, कैलास पाटील हे 13 हजार 467 मतांनी विजयी झाले. तुळजापूर विधानसभा मतदार संघात भाजपचे राणाजगजीतसिंह पाटील हे विजयी झाले त्यांना 99 हजार 34 मते पडली तर काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण यांना 75 हजार 865 मते पडली, आमदार राणा हे 23 हजार 169 मतांनी विजयी झाले. उमरगा येथे शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले हे 25 हजार 586 मतांनी विजयी झाले, त्यांनी विजयाची हॅट्रिक केली. चौगुले यांना 86 हजार 773 तर काँग्रेसचे दिलीप भालेराव यांना 61 हजार 187 मते पडली.