धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेची जागा महायुतीत जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेल्याची सूत्रांची माहिती असुन उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. सक्षम व सर्वसमावेशक चेहऱ्याला संधी देण्यास प्राधान्य असुन उमेदवाराचा शोध अद्याप संपलेला नाही. राष्ट्रवादीकडुन सुरेश बिराजदार हे इच्छुक असले तरी राहुल मोटे यांच्यासह अरविंद पाटील निलंगेकर यांची सुद्धा नावे चर्चेत आहेत. अरविंद पाटील हे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधु असुन ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करु शकतात अशी चर्चा आहे. विक्रम काळे, सतीश चव्हाण हा देखील पर्याय पक्ष श्रेष्टीकडे आहे. येत्या 2 दिवसात नाव अंतीम होऊ शकते.
धाराशिव लोकसभेसाठी शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस या महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असुन अपेक्षेप्रमाणे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे मात्र शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व भाजप या महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु असुन अखेर ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे.
भाजपकडुन बसवराज मंगरुळे, सुधीर पाटील, बसवराज पाटील, व्यंकट गुंड यांच्यासह अनेक जन इच्छुक आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व माजी खासदार रवींद्र गायकवाड हे इच्छुक आहेत तर राष्ट्रवादीकडुन सुरेश बिराजदार हे एकमेव इच्छुक आहेत. माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हे इच्छुक आहेत मात्र त्यांचा प्राधान्य भाजपाला असुन राष्ट्रवादीच्या पर्यायाची चाचपणी केली होती.
मंत्री तानाजीराव सावंत व आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे केंद्रात निवडणुक लढवायला तयार नसल्याने पक्षश्रेष्टी जागा भाजप किंवा सेनेला घ्यायला तितके उत्सुक नाहीत शिवाय अजित पवार गटाला काही जागा द्याव्या लागतील त्यामुळे हा पेच सोडविणे मोठे संकट आहे. अखेर जागा राष्ट्रवादीला सुटल्याचे सांगितले जाते, दिवसभरात राणा पाटील यांनी अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या त्यामुळे त्यांचे व पुत्र मल्हार यांचे नाव सुद्धा चर्चेत आले आहे.