धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असुन आज धाराशिव येथे जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ सोहळा संपन्न होणार आहे. डॉ सावंत हे आता थेट जनसंपर्क कार्यालय माध्यमातून लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. भुम परंडा, कळंब यानंतर आता धाराशिव शहरात लोकसभा जनसंपर्क कार्यालय सुरु करणार आहेत. सावंत यांच्या भूमिकेने सहकारी पक्षासह विरोधात धडकी भरली आहे.
मंत्री सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचे भावी खासदार असे पोस्टर सगळ्या मतदार संघात लावण्यात आले असुन शिवसेना गटाने धनंजय सावंत यांची उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे.
राज्यासह जिल्ह्याच्या राजकारणात मंत्री तानाजीराव सावंत यांची भुमिका महत्वाची राहिली आहे, ते किंगमेकर व जाईंट किलर म्हणून ओळखले जातात. महायुतीत धाराशिवची जागा ही परंपरागत शिवसेनेकडे राहिली आहे शिवाय मंत्री सावंत यांनी या जागेवर दावा ठोकला आहे. त्यातच त्यांचे पुतणे हे आता इच्छुक असल्याने कार्यकर्त्यांत नवंचैतन्य पसरले असुन त्यांनी यंत्रनेने आतापासुनच कामाला सुरुवात केली आहे
धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, बांधकाम सभापती असुन ते जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय आहेत शिवाय दांडगा जनसंपर्क व सर्वपक्षीय नेत्यांशी जवळीक आहे. शिवजल क्रांती, भैरवनाथ साखर कारखाना, जिल्हा परिषद व इतर स्थानिक निवडणुका याच्या माध्यमातुन धनंजय सावंत यांचा जनसंपर्क तळागाळातील कार्यकर्त्यात आहे.
कळंब शहरात “भावी खासदार धनंजय सावंत” असे बॅनर लावण्यात आले. कळंब शहरातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन धनंजय सावंत यांनी करुन आजपासुन लोकसभा निवडणुकीच्या कामाचा श्रीगणेशा केला, श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त साधत सावंत यांनी एक प्रकारे प्रचाराचा नारळच फोडला.
धनंजय सावंत यांच्या उमेदवारीसाठी पुणे येथे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली, या बैठकीत एकमुखाने धनंजय सावंत यांना उमेदवार म्हणून तिकीट मागण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यानंतर तात्काळ यंत्रणा पुर्ण ताकतीने कामाला लागल्याचे दिसते.