धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेसाठी 4 जुन रोजीच्या मतमोजणी प्रक्रियेची जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. धाराशिव जिल्ह्यात 6 विधानसभा मतदार संघ असुन त्यातील प्रत्येकी 5 अश्या 30 मतदान केंद्रातील EVM मतदान व VVPAT ( Voter Verifiable Paper Audit Trai ) यातील मतदान स्लिप याची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे EVM वर शंका घेण्याचे कारण नाही. मतमोजणी झाल्यावर प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्राच्या चिठ्या तयार केल्या जातील त्यातून 5 मतदान केंद्र हे VVPAT मतमोजणीसाठी निवडले जातील व त्याप्रमाणे EVM वरील मतदान आकडेवारी व VVPAT मधील चिठ्या जुळतात का हे तपासले जाईल.
4 जुन रोजी सकाळी आठ वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे, विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी होणार असुन 500 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा सुरक्षा बंदोबस्त असणार आहे. 1 हजार 200 अधिकारी-कर्मचारी मतमोजणी करणार आहेत असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
धाराशिव लोकसभासाठी 63.88 % मतदान झाले असुन 19 लाख 92 हजार 737 मतदार पैकी 12 लाख 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 6 लाख 90 हजार 533 पुरुष मतदार व 5 लाख 82 हजार 416 व 20 तृतीयपंथी मतदार यांनी मतदान केले. पुरुष मतदार टक्केवारी 65.53 तर महिला मतदार टक्केवारी 61.91 इतकी राहिली. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 2 लाख 45 हजार 627 मतदान झाले त्यापाठोपाठ धाराशिव लोकसभा मतदार संघात 2 लाख 34 हजार 106 मतदान झाले त्यामुळे या 2 मतदार संघाचा कौल महत्वाचा ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 68 हजार 137 इतके मतदान जास्त झाले त्यामुळे तेही महत्वाचे ठरणार आहे.
2024 मध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात सरळ लढत झाली. 2019 च्या निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 इतके मतदान मिळाले होते, ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते. ओमराजे यांना 49.5 तर राणाजगजीतसिंह यांना 38.9 टक्के मते मिळाली.