धाराशिव – समय सारथी
विधान परिषदेत आमदार यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठीचे विचारलेले तारांकित प्रश्न काही अधिकारी बॅलेट पुर्वी मॅनेज करीत असल्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लेखी पत्र लिहीत गंभीर आरोप केले आहेत. या लेटर बॉम्बमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
आमदार धस यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती यांच्याकडे लेखी तक्रार केली असुन त्यात अनेक गोप्यस्फोट केले आहेत. प्रश्न मॅनेज करण्यात मोठी साखळी असु शकते त्यामुळे याची चौकशी होऊन कारवाई होणार का हे पाहावे लागेल.
आमदार धस यांनी धाराशिव नगर परिषदेच्या बाबतीत केलेले प्रश्न मुख्याधिकारी वसुधा फड यांनी मॅनेज केल्याचा आरोप केला आहे. दाखल केलेले तारांकीत प्रश्न अस्वीकृत केल्याचे प्रकरण असुन कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रश्न मॅनेज केले जात असल्याने गंभीर प्रकरणाची दखल घेऊन उपसभापती यांनी तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.
धस यांनी दिलेल्या पत्रात असे नमूद आहे की, हिवाळी अधिवेशन 2023 साठी मी ऑनलाईन 27 प्रश्न दाखल केलेले होते परंतु त्यापैकी माझे फक्त 03 प्रश्न स्वीकृत करण्यात आले. 7 नोहेंबर 2023 रोजी परत 2 प्रश्न स्वीकृत करण्यात आले परंतु बहुतेक प्रश्न स्वीकृत न करण्याची कारणे गत अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्राप्त असून उत्तराकडे लक्ष वेधून पुनरावृत्ती टाळण्यासाठी अस्वीकृत / वस्तुस्थिती विचारा असे देण्यात आलेले आहे.
वास्तविक, गत अधिवेशनातील उत्तराच्या अनुषंगाने त्या उत्तरांतील त्रुटींनुसार त्या प्रश्नांचा पुन्हा पाठपुरावा करूनच नवीन मुद्द्यांनुसार तारांकित प्रश्न दाखल केलेले असतांनाही प्रश्न न वाचताच ते अस्वीकृत / वस्तुस्थिती विचारा मध्ये टाकण्यात आलेले आहेत. यातील अनेक तारांकित प्रश्न हे कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराशी संबंधित असून त्यात मंत्रालयीन वरिष्ठ अधिकारी, राज्यातील जबाबदार अधिकारी, कर्मचारी दोषी ठरत असल्याने सदर प्रश्न जाणीवपूर्वक स्वीकृत न करण्यात आल्याची शक्यता आहे.
काही प्रश्न हे धाराशीव नगर परिषद अंतर्गत विद्यमान मुख्याधिकारी ह्यांच्या कामातील अक्षम्य निष्काळजीपणाचे व जाणीवपुर्वक दोषींना पाठीसी घातल्याचे असुन सदर प्रश्न स्वीकृत करण्यात आलेले नाहीत. सदर प्रश्न हे बॅलेटपुर्वीच मी मॅनेज केलेले असुन ते स्वीकृत होणार नाहीत व खालीही येणार नाहीत असे विद्यमान मुख्याधिकारी हे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, नगर परिषद अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आदिंना सांगत असुन ही बाब अतिशय गंभीर असल्याने या गंभीर प्रकरणी – तातडीने दखल घेऊन आपल्या दालनात तातडीने बैठक आयोजित करावी अशी मागणी केली आहे.