खासदार ओमराजे निंबाळकर सुनावणीसाठी उपस्थितीत राहणार – कोर्टात लेखी म्हणणे सादर करणार
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात सीबीआयने त्यांचा अंतिम युक्तिवाद सादर करीत लेखी म्हणणे सादर केले. सीबीआयने केलेल्या तपासाच्या अनुषंगाने 20 मुद्दे उपस्थितीत केले असुन प्रत्येक मुद्दा व त्या मुद्याला पुरक असलेले पुरावे, कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. माफिचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैन यांचा कोर्टातील कबुली जबाब व शूटर दिनेश तिवारी याने कोर्टात दिलेल्या 164 च्या जबाब व इतर परिस्थितीजन्य, तांत्रिक पुराव्यावर सीबीआयने भर दिला आहे.
सीबीआयने खासदार ओमराजे निंबाळकर, आनंदीदेवी राजेनिंबाळकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे जबाब व इतर पुरावे सोबत जोडले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 सप्टेंबर रोजी मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात होणार आहे. सर्व आरोपीना कोर्टाने सुनावणीला हजर राहण्याचे आदेशीत केले आहे मात्र गेल्या सुनावणीवेळी काही जणांच्या हजेरी माफीच्या अर्जाना अंतिम वेळी मंजुरी दिली.
कै पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या याचिकेनंतर तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता त्यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे बाजु मांडत आहेत, ते कोणत्या मुद्यावर लेखी म्हणणे सादर करतात हे पाहावे लागेल. पवनराजे यांचे पुत्र जय राजे निंबाळकर हे कोर्टात पाठपुरावा करीत असून 2 सप्टेंबरच्या सुनावणीला खासदार ओमराजे निंबाळकर कोर्टात हजर राहण्याची शक्यता आहे.
सीबीआय केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाचे विशेष सरकारी वकील एजाज खान यांनी 25 व 26 ऑगस्ट रोजी अंतिम युक्तिवाद सादर केला. यावेळी सीबीआयच्या आयपीएस अधिकारी सायली धुरत यासह अधिकारी हजर होते. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची यात साक्ष झाली आहे. हत्याकांडाची सुनावणी संपवुन निकाल 30 सप्टेंबर पर्यंत देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत त्यानुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन व्हावे असे पत्र मुंबई उच्च न्यायालयाने 18 ऑगस्ट रोजी सुनावणीदरम्यान मुंबई ट्रायल कोर्टाला दिले आहे.
राजकीय कारकीर्द व अस्तित्व धोका बनलेल्या कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा 2005 मध्ये माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचला व 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केली असा ठपका ठेवला आहे. माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे संशयीत आरोपी आहेत, हे सर्व आरोपी जामीनावर आहेत.
दुहेरी खुन खटल्याची 4 जुलै 2011 पासुन सुमारे 14 वर्षापासुन सुनावणी सुरु आहे. 3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे येत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावतीने ऍड भुषण महाडिक हे बाजू मांडत आहेत तर इतर 8 आरोपींच्या वतीने ऍड नेहा सुळे ह्या बाजु मांडत आहेत.
सीबीआयच्या दोषारोप पत्रानुसार पारसमल जैन, सतीश मंदाडे हे डॉ पाटील यांच्या घरी गेले, मंदाडे याने जैन याची डॉ पाटील यांच्याशी ओळख करून दिली व सांगितले की, पवनराजे यांच्या हत्येची सुपारी यांना देण्यात आली आहे. मंदाडे याने संपवण्याचे तपशील व कारणे जैन याला सांगितली. हत्या केल्यानंतर 15 दिवसांनी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला हे दोघे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घरी गेले व तिथून त्यांच्याकडून पैसे घेऊन आले. शुक्ला याने 25 लाख जैन याला दिले. त्यातील 5 लाख रुपये राजस्थान येथील घरी ठेवून 20 लाख घेऊन जैन उत्तर प्रदेशला गेला, तिथे 20 लाख कैलाश यादव याला दिले. त्याने 5 लाख स्वतःला ठेवून 15 लाख छोटे पांडे यांच्याकडे दिले. 15 लाख पैकी 7 लाख पांडे याने स्वतःला ठेवले व उर्वरित 8 लाख पैकी प्रत्येकी 4 लाख तिवारी व पिंटू सिंग याला दिले. अश्या प्रकारे आरोपीनी 25 लाखांच्या सुपारीची ‘वाटणी’ केली.