धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुख्य संशयीत आरोपी डॉ पद्मसिंह पाटील यांना अंतीम युक्तिवाद सादर करण्यास 7 दिवसांची मुदत देण्यात आली असुन तसे आदेश कोर्टाने दिले आहेत. 28 ऑक्टोबर रोजी या खटल्याची सुनावणी होती मात्र डॉ पाटील यांचे वकील ऍड भुषण महाडिक यांची तब्येत ठीक नसल्याने यांनी सुनावणी पुढे ढकलावी असा अर्ज केला त्यावर कोर्टाने आदेश दिले.
डॉ पाटील यांच्या वतीने ऍड महाडिक यांनी या अगोदरच 15 दिवस युक्तिवाद सादर केला आहे त्यामुळे त्यांनी आगामी 7 कोर्ट कार्यालयीन वेळेत युक्तिवाद सादर करावा. जर त्यांनी या काळात युक्तिवाद सादर केला नाही तर त्यांनी लेखी म्हणणे/युक्तिवाद कोर्टात सादर करावा. हा खुन खटला हा अनेक वर्षांपासून सुरु असुन सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने या खटल्याचा निकाल वेळेत द्यावा असे निर्देश दिले आहेत त्यामुळे सुनावणी वेळेत पुर्ण करावी असे कोर्टाने आदेशात नमुद केले आहे.
मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी होत आहे. सरकार पक्षाच्या वतीने सीबीआय व तक्रारदार/याचिकाकर्ता आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने लेखी युक्तीवाद सादर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. खटला जलदगतीने चालवुन येत्या 3 महिन्यात अर्थात 27 जानेवारी 2026 पुर्वी निकाल द्यावा असे आदेशात नमुद केले आहे. यापुर्वी देखील सुप्रीम कोर्टाने निकालाची डेडलाईन दिली होती मात्र आता पुन्हा नव्याने तारीख दिली आहे. फिर्यादी व आरोपी या दोन्ही पक्षांनी सुनावणी वेळेत पुर्ण होण्यासाठी सहकार्य करावे असे सुप्रीम कोर्टाने म्हण्टले आहे.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल वेळेत द्यावा असे आदेश दिल्यानंतर सुनावणीला गती आली आहे. या खटल्यात सर्व बाजुकडील साक्षीदार, पुरावे झाले असुन अंतीम युक्तिवाद सुरु असल्याने खटला सुनावणीच्या अंतीम टप्प्यात आहे. डॉ पाटील यांच्या युक्तीवादनंतर इतर 8 आरोपीचा युक्तीवाद सादर होणार आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे. आरोपी पारसमल बादला उर्फ जैन हा माफिचा साक्षीदार बनला आहे, त्यानेच हे हत्याकांड उघड केले.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार राहू नये म्हणुन ड्राइवर समद काझी यालाही गोळया घालुन मारण्यात आले. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही.
पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांच्या याचिकेनंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला. 20 ऑगस्ट 2009 रोजी सीबीआयने माजी गृहमंत्री डॉ पाटील यांना मुख्य आरोपी करीत राजकीय द्वेषातुन हत्या केल्याचा ठपका ठेवत 9 जणांच्या विरोधात 5 हजार पानाचे चार्जशीट सादर केले. सीबीआयचे तत्कालीन जॉईंट डायरेक्टर ऋषीराज सिंग व पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर यांची भुमिका महत्वाची ठरली. याच तपासात समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येचा कट व सुपारी 30 लाखात दिल्याचे उघड झाले.












