अशी झाली पैशाची ‘वाटणी’ 17 महिने पाळत ठेवुन रचला ‘कट’ – सीबीआय तपासातील घटनाक्रम
धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात असुन 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील एजाज खान कोर्टात अंतिम युक्तिवाद सादर करीत आहेत. सीबीआयने तपासा अंती कोर्टात राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 आरोपी विरोधात दोषारोपपत्र दखल केले असुन त्यात हे ‘हत्याकांड’ का व कसे घडले याचा घटनाक्रम, थरार मांडला आहे. पवनराजे यांच्या हत्येसाठी तब्बल 17 महिने ‘कट’ रचून ‘पाळत’ ठेवण्यात आली, 25 लाखांची ‘सुपारी’ कोणी दिली, त्या पैशाची ‘वाटणी’ संशयित आरोपीत कशी झाली याचा ‘उलघडा’ केला आहे.
सीबीआयने केलेल्या तपासात असे दिसुन आले की, राजकीय कारकीर्द व अस्तित्व धोका बनलेल्या कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा 2005 मध्ये डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचला. जानेवारी 2005 मध्ये पारसमल जैन हे आर्थिक अडचण असल्याने मोहन शुक्ला यांना भेटले. त्यांनी डॉ पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला पवनराजे यांच्यापासून निर्माण झालेल्या धोक्या बद्दल सांगितले. पवनराजे यांची हत्या केल्यास पैसे दिले जातील असे सांगत लातूर येथे सतीश मंदाडे यांना भेटायला सांगितले.
त्यानंतर ते डॉ पाटील यांच्या घरी गेले व मंदाडे याने जैन याची डॉ पाटील यांच्याशी ओळख करून दिली व सांगितले की, पवनराजे यांच्या हत्येची सुपारी यांना देण्यात आली आहे. मंदाडे याने संपवण्याचे तपशील व कारणे जैन याला सांगितली. सुरुवातीला पवनराजे व त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मारण्याचे काम दिले जाईल असे सांगितले (जैन याने ते नाकारले). मंदाडे याने जैन याला पवनराजे निंबाळकर यांचे घर, कार्यालय दाखविले व 1 लाख रुपये ऍडव्हान्स दिला.
फेब्रुवारी 2005 मध्ये जैन याने पवनराजे यांचा खुन करण्यासाठी लातूर, धाराशिव येथील ट्रॅक्टर शोरूम येथे रेकी केली मात्र ते सापडले नाहीत. एकटे हत्याकांड करू शकत नसल्याचे जैन याने सांगत अधिक लोक व रक्कम लागेल असे सांगितले त्यावर 25 लाख सुपारी देण्याचे ठरले. त्यानंतर मंदाडे यांचा साडू राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक शशिकांत कुलकर्णी यांनी 2 टप्प्यात 4 लाख दिले. त्यानंतर जैन उत्तर प्रदेशात गेला व तिथे कैलाश यादवला भेटून छोटू पांडे, दिनेश तिवारी व पिंटू सिंग यांना 25 लाखांची सुपारी दिली, दीड लाख ऍडव्हान्स शस्त्र खरेदीसाठी दिले. सिवान बिहार येथून 2 देशी कट्टे आणले.
मे 2006 मध्ये शुटर वाराणसी येथील मुंबईत आले, तिथे त्यांनी 20 मे ला जुनी गाडी खरेदी केली, त्यात ते लातूर येथे आले व तिथे मानस लॉजला थांबले, 4 दिवस रेकी केली मात्र पवनराजे सापडले नाहीत. मंदाडे याने पवनराजे यांचा नंबर जैनला दिला व सांगितले की पवनराजे यांची बार्शी येथील जमीन विक्री करायची आहे. ती जमीन खरेदी करण्यासाठी खरेदीदार म्हणून महेंद्र जैन या नावाने फोन करून भेट घे व तिथे आल्यावर संपव. त्यानुसार कट रचला व जैन याने लोकल पीसीओ वरून फोन करून पवनराजे यांना सांगितले की बार्शी येथील जागेत जैन मंदीर बांधायचे आहे म्हणून ती जागा विकत घेतो व त्यासाठी भेटू.
पवनराजे हे मुंबईवरून पुण्याकडे जात असताना कळंबोली जवळ भेटीचे ठिकाण ठरले व तिथे शुटर व जैन ‘घात’ लावुन बसले. त्यांना पांढऱ्या रंगाची स्कोडा गाडी दिसल्यावर जैन याने हात दाखवून गाडी थांबवली. त्यावेळी पवनराजे मागील सीटवर झोपले होते व समद काझी गाडी चालवत होते. जैन याने पवनराजे यांच्याबाबत विचारले तितक्यात तिवारी, पिंटू सिंग जवळ आले. पवनराजे यांना ड्राइवर काझी यांनी उठवले, पवनराजे यांनी उजव्या दरवाज्याची ग्लास खाली घेताच दोघांनी गोळीबार केला त्यात राजे यांच्या उजव्या डोळ्याजवळ गोळी लागून जागेवर मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पुरावा नष्ट करण्यासाठी समद काझी यांना सुद्धा मारण्यात आले. दोघे मेल्याची खात्री झाल्यावर शस्त्र व इतर पुरावे नष्ट करून आरोपी फरार झाले व मोहन शुक्ला याला काम केल्याचे फोन करून सांगितले.
पारसमल जैन व पिंटू सिंग 4 जूनला राजस्थानला गेले. दुसऱ्या दिवशी जैन याने शुक्ला याला फोन करून पैशाची मागणी केली, 15 दिवसांनी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला हे दोघे डॉ पद्मसिंह पाटील यांच्या कुलाबा येथील घरी गेले व तिथून त्यांच्याकडून पैसे घेऊन आले. शुक्ला याने 25 लाख जैन याला दिले. त्यातील 5 लाख रुपये राजस्थान येथील घरी ठेवून 20 लाख घेऊन उत्तर प्रदेशला गेला, तिथे 20 लाख कैलाश यादव याला दिले. त्याने 5 लाख स्वतःला ठेवून 15 लाख छोटे पांडे यांच्याकडे दिले. 15 लाख पैकी 7 लाख पांडे याने स्वतःला ठेवले व उर्वरित 8 लाख पैकी प्रत्येकी 4 लाख तिवारी व पिंटू सिंग याला दिले. अश्या प्रकारे आरोपीनी 25 लाखांच्या सुपारीची ‘वाटणी’ केली.
वादाचा इतिहास – यातून झाले ‘कांड’
2004 साली पवनराजे यांनी डॉ पाटील यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक अपक्ष उमेदवारी लढवली होती, त्यात डॉ पाटील हे अवघ्या 484 मतांनी विजयी झाले, त्यावेळी “पवनराजे यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा” अशी बातमी ऐन मतदानाच्या दिवशी एका वृत्तपत्रात प्रकाशित करुन त्याचे अंक वाटप करण्यात आल्याने संभ्रम व गोंधळ उडाला होता. विधानसभा निकालानंतर तेरणा ट्रस्ट व तेरणा साखर घोटाळा आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते, पवनराजे यांनी तेरणा ट्रस्ट मालकी बाबत कोर्टात प्रकरण दाखल केले. त्यावरून वाद टोकाला गेला होता. हत्यानंतर 13 व्या दिवशी तक्रारदार हयात (मयत) नसल्याचे कारण देत हे प्रकरण कोर्टात बंद करण्यात आले.
न्यायमूर्ती पी बी सावंत आयोगात भ्रष्टाचारात दोषी सापडल्याने डॉ पद्मसिंह पाटील यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यामुळे ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली, मात्र अण्णा समाजसेवक असल्याने जैन यांनी ती नाकारली, ते प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असुन हत्येचा कट व सुपारी दिल्याप्रकरणी डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला 3 जणावर 25 सप्टेंबर 2009 साली गुन्हा नोंद होऊन लातूर कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही. 9 ऑक्टोबरला याची सुनावणी होणार असुन गेली 16 वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित आहे.
आरोपी पारसमल जैन हा यात माफिचा साक्षीदार आहे, तुरुंगात असताना त्याची मुलगी वर्षा भेटायला गेली, वडिलांनी सांगितल्या प्रमाणे तिने सीबीआयच्या अधिकार्यांना 27 एप्रिल 2009 रोजी एक लेखी पत्र लिहून त्यात पवनराजे हत्याकांडाचा खुलासा केला. त्यानंतर जैन याने न्यायाधीश एस बी महाले यांच्या कोर्टात 164 अंतर्गत जबाब दिला, त्याच आधारावर हत्याकांडाचा खुलासा होत, डॉ पाटील व इतर आरोपीना अटक करण्यात आली.