धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर हत्याकांडात अधिकचे साक्षीदार तपासण्यासाठी दाखल केलेली याचिका डॉ पद्मसिंह पाटील यांनी विथड्रॉ ( माघार ) केली आहे. डॉ पाटील यांच्या म्हणजेच आरोपीच्या बाजुने 20 साक्षीदार तपासण्यासाठी ट्रायल कोर्टात यादी दिली होती मात्र कोर्टाने आदेशाने 2 साक्षीदार तपासले गेले, त्याच्या विरोधात डॉ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात सीबीआय व इतरां विरोधात याचिका दाखल केली होती मात्र ती माघारी घेतली असुन अंतीम लेखी युक्तिवादात ते इतर साक्षीदार यांची बाजु मांडतील. ही याचिका माघारी घेतल्याने सुनावणीसाठी अधिकचा वेळ लागणार नाही. आरोपी मंदाडे, शुक्ला व कुलकर्णी यांच्या वतीने युक्तिवाद सुरु झाला आहे त्याच्या वतीने वकील 7 फेब्रुवारीला कोर्टात बाजु मांडतील.
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर पै समद काझी दुहेरी हत्याकांडात मुख्य आरोपी राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी कोर्टात अंतीम युक्तिवाद केला असुन लेखी युक्तिवाद सादर केला जाणार आहे. डॉ पाटील यांनी हत्या केली नसुन त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद सादर केला. लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर अधिकची भुमिका स्पष्ट होणार आहे. सर्व आरोपींचा युक्तिवाद येत्या काही दिवसात पुर्ण होऊ शकतो, त्यानंतर हे प्रकरण निकालाच्या टप्यात जाईल. मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए जोगळेकर यांच्या कोर्टात याची सुनावणी सुरु आहे. या हत्याकांडातील 2 आरोपी शुटर पिंटू सिंग व दिनेश तिवारी हे जेलमध्ये असुन इतर जामीनावर आहेत.
राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पदमसिंह पाटील यांच्यासह 9 जण या रक्तरंजित हत्याकांडात आरोपी असुन त्यात डॉ पाटील यांना सीबीआयने हत्या, कट रचणे यात मुख्य आरोपी केले आहे. आनंदीदेवी राजेनिंबाळकर ह्या फिर्यादी आहेत. पारसमल जैन या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनला झाला असुन समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार यांची साक्ष झाली आहे. सरकारी व आरोपी पक्षाचे साक्ष, पुरावे संपले असुन हे प्रकरण अंतीम टप्प्यात आहे. डॉ पाटील हे प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत अनेक वेळा सुनावणीसाठी गैरहजर राहत असल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली, त्यावर आक्षेप घेत लवकर सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार देखील ठोठवावे लागले, तेव्हा याला गती आली आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी खासदार ओमराजे यांनी तत्कालीन गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती तर जनआक्रोश मोर्चात पवनराजे हत्या प्रकरणी गेली 18 वर्षापासुन न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. 4 जुलै 2011 पासुन सुमारे साडे 13 वर्षापासुन या दुहेरी खुन खटल्याची सुनावणी सुरु आहे, जी आता अंतीम टप्प्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने 2013 मध्ये हा खटला अलीबागवरून मुंबई सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.
3 जून 2006 ला पवनराजे निंबाळकर व त्यांचा ड्राइवर समद काझी हे मुंबईवरून धाराशिवकडे पांढऱ्या रंगाच्या स्कोडा गाडीने येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे दिवसा ढवळ्या गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. पवनराजे हे झोपलेले असताना त्यांची गाडी हात दाखवुन थांबवण्यात आली त्यानंतर ड्राईव्हरने काच खाली घेताच गोळ्या झाडण्यात आल्या. बंदूक फेकून दिल्यानंतर आरोपीनी इंडिका गाडी पनवेलच्या बेलवली जवळ सोडून दिली. हत्याकांडाचा तपास सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस त्यानंतर, सीआयडीने केला मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी यांनी या खुनाचा तपास सीबीआयने करावा अशी फौजदारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने 23 ऑक्टोबर 2008 रोजी तपास सीबीआयकडे देण्यात आला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची सुपारी व कट रचल्याच्या प्रकरणात लातुर कोर्टात तारीख पे तारीख असा सिलसिला सुरु आहे. 2009 साली गुन्हा नोंद झाल्यानंतर तब्बल 10 वर्षाने सीआयडीने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मोहन अनंत शुक्ला व सतीश रानबा मंदाडे या 3 आरोपी विरोधात लातुर कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. 2022 पासुन या प्रकरणात चार्ज फ्रेम ( आरोप निश्चिती प्रक्रिया ) न झाल्याने प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झालेली नाही. डॉ पद्मसिंह पाटील व शुक्ला हे वेगवेगळी कारणे देऊन सुनावणीस गैरहजर राहत हजेरी माफिचा अर्ज देत आहेत तर मंदाडे याच्या विरोधात कोर्टाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे मात्र तो गेली दीड वर्षापासुन पोलिसांना सापडेना झाला आहे. अण्णा हजारे हत्या सुपारी प्रकरणाची पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी 2025 रोजी लातुर येथील कोर्टात होणार आहे. ऍड मोहन जाधव हे तिघांच्या वतीने कोर्टात वकील आहेत. डॉ पाटील, शुक्ला व मंदाडे हे तिघेही पवनराजे हत्याकांडात आरोपी असुन त्याचं गुन्ह्यात हे प्रकरण उघड झाले होते, गुन्हा नोंद झाल्यापासुन या प्रकरणाला 15 वर्ष झाली आहेत.