धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची अमेडिया यां कंपनीचा जमीन घोटाळा बाहेर आला आहे. पार्थ पवार यांचे पार्टनर दिग्विजय पाटील हे राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे भाचे असुन ते सुनेत्रा यांचे बंधु अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. दिग्विजय हे त्यात पार्टनर आहेत.
अवघे काही लाख भांडवल असलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला 1800 कोटी रुपये बाजार मुल्य असलेली कोरेगाव पार्क यां महत्वच्या भागातील 40 एकर शासकीय जमीन आयटी पार्कच्या नावाखाली 300 कोटी रुपयांना देण्यात आली. या व्यवहारासाठी लागणारी तब्बल 21 कोटींची स्टॅपड्युटीही माफ करण्यात आली, त्यांनी अवघे 500 रुपये मुद्रांक शुल्क भरले. 300 कोटी व इतर व्यवहार तपासले जाणार आहेत.
विशेष म्हणजे ही जमीन महार वतनातील असुन या जमिनीचा व्यवहार हा शीतल तेजवानी यांच्या पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत अमेडिया कंपनीनं केला आहे. प्रत्यक्षात खरेदी खत हे गायकवाड आणि 274 मूळ मालक यांच्यासोबत अमेडिया कंपनीने केला आहे. हा सगळा व्यवहार नियमबाह्य असुन एक मोठा जमीन घोटाळा आहे असा आरोप आहे.
जमीन घोटाळ्यात तहसीलदार सूर्यकांत येवले व हवेली विभागाचे दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबन केले आहे. चौकशी पुर्ण होईपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करीत आहेत. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. मी कोणताही घोटाळा केलेला नाही, असे पार्थ पवार यांनी सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखील समिती गठीत केली आहे.
जमीन घोटाळ्यात सहभागी असलेल्या कंपनीत पार्थ पवार अर्थात अजित पवार यांच्या नातेवाईक यांचा समावेश आहे. दिग्विजय पवार हे तेर येथील असुन त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जाणार आहेत. अमरसिंह पाटील आणि सुनेत्रा पवार हे माजी मंत्री डॉ. पदमसिंह पाटील यांचे सावत्र भाऊ बहिण आहेत. मात्र अमरसिंह पाटील आणि पदमसिंह पाटील यांच्यात राजकीय मतभेदामुळे तितकेसे सौहार्द नव्हते त्यामुळे दोघांमध्ये कोणतेही आर्थिक संबंध किंवा संयुक्त उद्योग नव्हते.
अमरसिंह पाटील हे तेर गावात राहून शेतीचा व्यवसाय पाहायचे, ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले नाहीत. सुनेत्रा पवार यांचा अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर अमरसिंह पाटील व त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घेतली. पुढे अमरसिंह पाटील हे काही काळ बारामती आणि पुणे परिसरात स्थायिक झाले. 2018 मध्ये अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी व आई पुण्यात स्थायिक झाल्या.
दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे वाढला. त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील बिबेवाडी येथे झाले, तर पुढील शिक्षण एमआयटी महाविद्यालयातून बीए पदवीपर्यंत पूर्ण केले. सध्या दिग्विजय पाटील हे आई आणि आजीसह पुण्यात राहतात. तो पार्थ पवार याचा जवळचा मित्र असून दोघे बिझनेस पार्टनर आहेत..












