धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील उपळा, जवळे दुमला व वाघोली या गावच्या 700 कुणबी मराठा नोंदी बार्शी येथील रेकॉर्डमध्ये सापडल्या असुन तसा अहवाल तहसीलदार शिवानंद बिडवे यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. मोडी लिपीतील या नोंदी असुन यात जन्म मृत्यू अश्या स्वरूपाच्या नोंदी असुन या सर्व नोंदी ऑनलाईन करण्यात येणार आहेत. अभिलेख तपासणीत उपळा येथील 654, वाघोली 23 व जवळा दुमला येथे 29 जणांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मराठा आरक्षण लढ्यात ही गावे सहभागी झाली होती त्या लढ्याला यश देखील मिळाले आहे.
कुणबी मराठा नोंद यादी – 700 नावे PDF फाईल
धाराशिव जिल्ह्यात यापुर्वी 1 हजार 603 नोंदी सापडल्या होत्या त्याआधारे 3 हजार 300 जणांना मराठा कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यानंतर काही भागात नवीन नोंदी शोधण्याची मोहीम जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी सुरूच ठेवली होती त्याला तहसीलदार बिडवे, मोडी लिपीचे अभ्यासक, भाषातरकार यांनी साथ दिल्याने मोठे यश मिळाले आहे.जिल्ह्यात आणखी नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे, हा भाग निजाम राजवटीत येत असल्याने काही नोंदी ह्या हैद्राबाद येथेही आहेत.
तत्कालीन बार्शी तालुक्यात धाराशिव तालुक्यातील अनेक गावे समाविष्ट होती त्यातच हा तालुका इंग्रज यांच्या अमलाखाली येत असल्याने रेकॉर्ड ठेवण्यात आले आहे. बार्शी तहसीलदार यांनी हे रेकॉर्ड धाराशिवला दिल्यानंतर त्याची तपासणी करुन जन्म मृत्यू नोंदीच्या आधारे यादी अंतीम करुन पाठवण्यात आली आहे, आता त्याआधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.