मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी २१ व २२ नोव्हेम्बर रोजी विशेष ग्रामसभा – जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात मराठा कुणबी सोबत ब्राह्मण,माळी वाणी,ठाकर, पोतराज समाजाच्या लोकांची कुणबी अशी नोंद सापडली आहे. धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मराठा कुणबी अश्या 138 नोंदी सापडल्या असुन येडशी येथे ब्राह्मण, माळी, आदीवासी ठाकर, पोतराज, लिंगायत वाणी समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत.
येडशी येथील ग्रामस्थांनी याबाबतची कागदपत्रे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना दिली असून जिल्हाधिकारी याची पुष्टी केली आहे.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सुद्धा पुरावे पहिले. शिक्षण विभागाने या नोंदी प्रमाणित केल्या असुन तसा अहवाल गटशिक्षण अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना दिला आहे.
1866 ते 1920 या काळातील शालेय शिक्षणाच्या विद्यार्थी रजिस्टरच्या नोंदीवर कुणबी अश्या नोंदी सापडल्या आहेत. ब्रिटिश काळात येडशी येथे आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा होती त्या शाळेच्या जुन्या रेकॉर्डवर या 138 नोंदी सापडल्या आहेत. गुरु गणपती पाटील हे ब्राह्मण असताना जातीच्या रकान्यात कुणबी अशी नोंद आहे. क्षत्रि शेखू माळी हे माळी आहेत, हरि रामा ठाकर हे आदिवासी ठाकर जमातीतील आहेत, शामराम पोतराज हे पोतराज, रामा तात्या अवधूत हे लिंगायत वाणी आहेत मात्र त्यांच्या शालेय कागदपत्रावर जातीच्या रकान्यात कुणबी अशी नोंद आहे.
शेती करणारा कुणबी म्हणून सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र द्या, येडशी गावातील लोकांची मागणी आहे. इतर समाजाच्या व्यक्तींची नावे असून यात जात कॉलममध्ये कुणबी अशी नोंदी आहेत असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात आणखी नोंदी तपासणीचे काम सुरु असुन आजवर जवळपास 41 लाख कागदपत्रे तपासली आहेत.
मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील कुणबी नोंदी सापडलेल्या ७७ गावात २१ व २२ नोव्हेम्बर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित केली असून त्यात ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यांची कागदपत्रे ऑनलाईन करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यात आजवर १ हजार २१५ नोंदी सापडल्या असून ११५ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.