धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांच्यावर गंभार स्वरूपाचे आरोप करीत तहसीलदार डॉ मृणाल जाधव, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेने आज पासुन कामबंद आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनामुळे तहसीलदार कार्यालय सामसुम झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना लेखी निवेदन देण्यात आले असुन त्यात अनेक आरोप केले आहेत. धाराशिवच्या इतिहासात पहिल्यांदाच तहसीलदार व कार्यालयातील कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. 26 डिसेंबर रोजी 5.30 वाजण्याच्या दरम्यान उपविभागीय अधिकारी डव्हळे व त्यांचे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी तहसील कार्यालयात अचानक भेट दिली त्यानंतर इनाम, सीलिंग व एलएनडी संकलनाचे सहायक महसूल अधिकारी यांची दप्तर तपासणी केली सदरील दप्तर तपासणी ते कार्यालयात आल्यापासून या शाखेच्या खोलीचे दार बंद करून रात्रीचे 7 वाजेपर्यंत केली. त्यामुळे त्यांचे शारिरिक व मानसिक संतुलन खराब झाले आहे. त्यानंतर ते तहसिलदार यांच्या दालनात बसून रात्री 8.30 वाजेपर्यंत इतर कर्मचारी यांना बोलावून घेतले. तहसिलदार मॅडम दौ-यावरुन परत आल्यानंतर गौणखनिज शाखेतील संचिकेची पाहणी केली. नैसर्गिक आपत्ती शाखेचा अनुदान वाटप बाबत चौकशी केली, कुळ विभागाच्या संचिकांची तपासणी केली. लेखा शाखेच्या कॅशबुकची पाहणी केली. काही स्पष्टीकरण दिले असता त्यांची त्याबाबत ऐकून घेण्याची मन:स्थिती नव्हती व त्यांना सगळ्यांसमोर अपमानास्पद वागणूक दिली.
दप्तर तपासणी करत असताना कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरून घेण्यात आला नाही. त्यानंतर तहसिलदार यांचे समक्ष भूसंपादन व प्रमाणपत्र कार्यासनाचे महसुल सहायक यांना कार्यालयात बोलावण्यात आले व त्यांची वैयक्तिक तक्रार झालेली असल्याने त्याबद्दल संबंधितास एसीबीमध्ये घालतो, मी तालुकास्तरीय भ्रष्टाचार समिती अध्यक्ष आहे. तुमची सगळ्यांची वाट लावतो. तुमची एसीबीमध्ये माझ्याकडील लोकांकडून तक्रार करून वाट लावतो अशा धमकी दिल्या आहेत. यामुळे कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व कर्मचारी दहशतीमध्ये व मानसिक त्रासामध्ये आहेत. त्यामुळे याचा कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे असा आरोप करीत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
उपविभागीय अधिकारी यांचेकडून पुर्वग्रहित व्देषातून तहसिलदार व कार्यालयीन कर्मचारी यांना टार्गेट करून त्रास देणे अशा बाबी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यांचे न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास नाही तरी त्यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात यावी अथवा आमच्या अधिकारी व कर्मचारी यांची बदली अन्य ठिकाणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.