कला केंद्रबाबत ठोस भुमिका, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश, शाळा व आश्रम सुरु करण्याचा सल्ला
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र बाबत राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी ठोस भुमिका घेतली आहे. चुकीचे प्रकार करणाऱ्या कला केंद्रावर कारवाई करा तर ज्यांनी नवीन कला केंद्र सुरु करण्यासाठी प्रस्ताव दिले ते सर्व प्रस्ताव फेटाळून लावावे, एकही नवीन कला केंद्र सुरु होणार नाही अशी रोखठोक भुमिका त्यांनी घेतली आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रितु खोखर यांना त्यांनी तसे आदेश दिले आहेत.
एकीकडे प्रशासन नियमांचा भंग करणाऱ्या कला केंद्रावर कारवाई व ते रद्द करीत असताना दुसरीकडे प्रशासनाने नवीन कला केंद्र यांना मंजुरी द्यावी यासाठी एका नेत्याच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. नवीन कला केंद्रसाठी सर्व सेवा सुविधानी युक्त मोठं मोठाले बांधकाम केले आहे, काही ठिकाणी 24 -30 रूम बांधल्या आहेत, 1 -2 कोटी रुपयात गुंतवणूक केली आहे, त्यांनी आता जगायचं कस ? त्यामुळे जिल्हाधिकारी यांना सांगून परवाने द्या असा ‘हट्ट’ त्या नेत्याने पालकमंत्री यांच्याकडे केला मात्र पालकमंत्री यांनी सगळे ऐकून घेत नकार देत फटकारले आहे.
स्वतःचे राजकीय वजन वापरून ही भेट घडवून आणणारा तो नेता कोण ? याची चर्चा रंगली आहे. काही कला केंद्रात धनवान व स्वतःला प्रतिष्टीत समजणाऱ्या मंडळींनी नफा कमवण्यासाठी आर्थिक गुंतवणूक असल्याचीही चर्चा आहे. त्यात माध्यमातून ही भेट घडवून आणली मात्र अनेक तरुण व कुटुंब बरबाद होत असल्याने सामाजिक जाणीव ठेवून पालकमंत्री यांनी नकार दिला आहे, उलट त्यांनी नवीन परवानगी देऊ नका व जे नियम मोडतात त्याच्यावर कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. एकंदरीत ‘तोडगा’ काढण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला ही भेट ‘अंगलट’ आली आहे.
20-30 रूम असे टोलेजंग बांधकाम केले असेल तर इतक्या भव्य वास्तुत त्यांनी सामाजिक भावनेतून त्या ठिकाणी कलाकेंद्र ऐवजी अनाथ मुलासाठी शाळा, वृद्धश्रम इतर सामाजिक उपक्रम सुरु करावे, सामान्य लोकही ते स्वीकारतील व त्या उपक्रमाला सरकार तात्काळ परवानगी देईल असे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सांगत भुमिका स्पष्ट केली. केवळ गुंतवणूक केली म्हणुन परवानगी देऊन लोकांची घरे बरबाद करायची का ? मी अश्या गोष्टींना थारा देणार नाही, असे ते दैनिक समय सारथीशी बोलताना म्हणाले.
जे नवीन प्रस्ताव प्रलंबित आहेत त्यांतील काहींची अगोदरच कलाकेंद्र आहेत. आळणी येथील बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांचा “पिंजरा” केंद्राचा परवाना नुकताच रद्द केला आहे त्यांचा व सोलापूर बाळे येथील अक्षय साळुंके यांचा नवीन प्रस्ताव प्रलंबित आहे. अक्षय साळुंके यांचा महाकाली केंद्रचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे पण ते प्रकरण उच्च न्यायालयात आहे. थोडक्यात काही ठरविक मंडळी या व्यवसायात गुंतली आहेत. जामखेडसह अन्य भागातील लोकही जोडीला आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई व पिंजरा या 2 कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी रद्द केला असुन महाकालीचाही प्रस्ताव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथका मार्फत छापे टाकून नियम मोडल्याने गुन्हे नोंद केले. आगामी काळातही कला केंद्रावर पोलिसांची व प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. कला केंद्राना देवी देवतांची नावे देऊन काही ठिकाणी नियमभंग सर्रास सुरु आहे.
हे नवीन कला केंद्र प्रस्ताव आहेत प्रलंबित –
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे अंबिका कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी प्रस्ताव दिला आहे मात्र तो मंजुर केला नाही, असे असतानाही तुळजाभवानी व येडेश्वरी देवीच्या फोटोसह इथे सगळी सजावट करून हे कला केंद्र सज्ज झाले आहे.
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे रेणुका कला केंद्रसाठी परवाना मिळावा म्हणुन येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी अर्ज केला आहे तर लोकनाट्य कला केंद्रसाठी बाबासाहेब गाठे व सोलापूर बाळे येथील अक्षय साळुंके, तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे चंद्राई कला केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी अरविंद गायकवाड, आळणी येथे प्यासा केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत.