धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्राचे परवाने जिल्हाधिकारी यांनी रद्द करायला सुरुवात केल्यावर कला केंद्र येथील नर्तिका व चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सरसकट कला केंद्रावर परवाने रद्द करण्याची कारवाई नको, आमचाही विचार करा, नियम मोडणाऱ्यावर कारवाई करा, आमच्यावर उपासमारीची वेळ येईल असे म्हणत शिष्टमंडळाने त्यांच्या व्यथा मांडत निवेदन दिले.
लावणी ही महाराष्ट्राची लोककला असुन आम्ही ती गेली अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीने सादर करतो. लावणीमध्ये भाव व अभिनय असुन अनेक समाजिक विषयावर प्रकाश पडणारी व ज्वलंत विषय मांडणारी आहे. आमच्यातील काही कला केंद्र व तेथील नर्तिका यांना राज्य पातळीवरील लावणी स्पर्धेत पुरस्कार देखील मिळाले आहेत. कला केंद्रात आम्ही कला सादर करतो, कोणतेही चुकीचे काम करत नाही किंवा त्याचे समर्थन करीत नाही. एखाद्या ठिकाणी काही झाले म्हणुन सगळ्यावर सरसकट कारवाई करू नये अशी विनंती या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली.
सरसकट कला केंद्र परवाना रद्द केल्यास कला व कलाकार संपेल. आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. आम्ही मुला बाळासह जगायचं कसे? दुसरे कुठलेही साधन नाही, त्यामुळे आमचाही सहानभूतीपुर्वक विचार करावा. प्रशासन व पोलिस यांनी घालून दिलेल्या अटी, नियम आम्ही पाळू. जे नियम मोडतात, चुकीचे कृत्य करतात त्यांच्यावर कारवाई करावी मात्र सगळ्यावर नको. काही नर्तिका चुकीचे करत असतील त्याची शिक्षा आम्हाला नको असे म्हणत विचार करावा असे म्हणटले आहे.
लावणी ही महाराष्ट्राची लोककला असुन ती जपली पाहिजे मात्र कलेच्या नावाखाली काही ठिकाणी चुकीचे प्रकार होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. कारवाई केली जाईल अशी भुमिका पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी स्पष्ट केली. नियम व कायदा पाळा, तो मोडल्यास कारवाई करू अशी स्पष्ट भुमिका जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी घेतली आहे.