दैनिक समय सारथी वृत्तपत्राने मांडला होता विषय – काही केंद्रावर कलेच्या नावावर गैरप्रकार, कारवाईच्या रडारवर
धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील बाबासाहेब राजाभाऊ गाठे यांना देण्यात आलेला “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र” चा परवाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी रद्द केला आहे. अटी व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने परवाना तात्काळ रद्द करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कला केंद्रावर धाड टाकत नियमाचा भंग केल्याने गुन्हा नोंद करून परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी चुकीच्या कला केंद्रावर कारवाईचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असुन ठोस भुमिकेमुळे कौतुक होत आहे. अनेक कुटुंब काही कला केंद्रामुळे बरबाद झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यातील काही कला केंद्र व तिथे चालणाऱ्या गैरप्रकारबाबत दैनिक समय सारथी वृत्तपत्राने आवाज उठवीत वस्तुस्तिथी मांडल्यानंतर प्रशासनाने कारवाईची पावले उचलायला सुरुवात केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील नियम मोडलेली काही कला केंद्र कारवाईच्या रडारवर आहेत. धाराशिव जिल्ह्यातील काही भाग कला केंद्राच ठिकाण म्हणुन ओळखले जात असुन जवळपास 6 नवीन परवाने अर्ज दाखल असुन ते प्रलंबित आहेत.
पूर्वी दिलेल्या आदेशानुसार पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राला लोकनाट्य कला सादरीकरण, कार्यक्रमांची अनुमती,सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रम आदींसाठी अटी व शर्ती घालून परवाना देण्यात आला होता मात्र,परवान्यातील अटींचे उल्लंघन झाल्याने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा क्र. १९२/२०२५ व कलम २२३ भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
या कलानाट्य केंद्राच्या संचालकाने परवाना मिळालेल्या अटींचे पालन न करता बेकायदेशीर कृत्ये केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासणीत आढळून आले.त्यामुळे पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर केला होता. अहवालाच्या आधारे नियम क्र.२२६ (ii) अन्वये सदर परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे “पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र” (येडशी ,ता. धाराशिव) यांचा परवाना आता रद्द झाला आहे. पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत या केंद्राला परवाना देण्यात येणार नाही,अशी भुमिका जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केली आहे.