लोककलेच्या नावावर विकृती तर माफी नाही, कारवाई करून कुलुप लावा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पोलीसांनी दिला असुन त्यावर तात्काळ कारवाई करा असे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना दिले. घटना घडली म्हणुन फक्त हे एक कला केंद्र नाही तर ज्या ठिकाणी कला केंद्राच्या नावावर चुकीचे प्रकार होत असतील ती तात्काळ बंद करून त्यांना कुलूप लावा असे पालकमंत्री सरनाईक म्हणाले.
लोक कला ही महाराष्ट्राची संस्कृती असुन त्याचा गैरवापर करत असेल तर त्याला बिलकुल माफी दिली जाणार नाही, ताबडतोब कारवाईचे आदेश त्यांनी दिले. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने कला केंद्र व तेथील गैरप्रकार समोर आणत पाठपुरावा केला आहे.जिल्ह्यातील काही कला केंद्रावर चुकीचे प्रकार सर्रास होत असुन त्यावर आळा घालत कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिस आता कोणत्या केंद्रावर कारवाई करतात हे पाहावे लागेल.
लोककला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती जिवंत राहिली पाहिजेत, ती जिवंत ठेवत असताना काही कला केंद्रावर कलेच्या नावावर हे काही सुरु आहे ते भयंकर असुन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना याबाबत कारवाईचे आदेश देत आहे. कलेचा चुकीच्या पद्धतीने वापर, त्या व्यासपीठाचा वापर होत असेल तर ते चुकीचे आहे.
सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांची मुले डान्स बारच्या आकर्षणामुळे मुंबईपर्यंत यायची, डान्सबारचे लोन सोलापूर जिल्ह्यापर्यंत आले आहे, अशी स्तिथी जेव्हा निर्माण होते तेव्हा शासनकर्ते म्हणुन आमची जबाबदारी आहे की लोककलेच्या नावावर चुकीचा पायंडा पाडत चुकीचे प्रकार होत असतील तर ते योग्य नाही.
वृत्तपत्रात आलेल्या बातम्या व तिथली स्तिथी मनाला वेदना देणारी आहे. उपसरपंच बर्गे यांनी स्वतःला संपवले हे मंत्री म्हणुन वेदना देणारे आहे. कला केंद्रावर कलेच्या नावावर कोणी चुकीचे, व्याभिचार करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा. शेतकऱ्यांची मुले यात वाया जात असतील तर अशी कलाकेंद्र ताबडतोब बंद करून त्यांना कुलूप लावा असे ते म्हणाले.
पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावा असा अहवाल वाशी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संग्राम थोरात यांनी दिला आहे. वारंवार नियमांचा भंग होत असल्याने कायदा सुव्यवस्था व इतर कारणे नमूद करीत पोलिसांनी हा अहवाल तहसीलदार प्रकाश म्हत्रे यांच्याकडे सादर केला असुन त्यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे पाहावे लागले. वाशी तहसीलदार प्रकाश म्हत्रे यांनी 17 जुन 2025 रोजी या कलाकेंद्राचा परवाना निलंबित केला होता मात्र त्याला स्थागिती देण्याचे ‘दिव्य’ काम जिल्हाधिकारी कार्यालयाने केले होते.
तुळजाई कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व गुन्हे, पुजा गायकवाड हिचा व आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ, दारू विक्री, रात्री उशिरा सुरु असणे, डीजेचा सर्रास वापर, स्थानिक महिला व ग्रामस्थाचा विरोध, विविध संघटना यांच्या तक्रारी, कला केंद्रात महिला नर्तकी यांची झालेली छेडछाड व त्या असुरक्षित असणे यासह अन्य कारणे व कागदपत्रांची जंत्री अहवालासोबत जमा केली आहे.
उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्राचा विषय ऐरणीवर आला होता. पुजा ही नर्तकी तुळजाई कला केंद्रात होती, तिथे त्या दोघांचे प्रेम बहरले व वाद टोकाला गेला. आत्महत्यापुर्वी बर्गे हे पुजाला भेटायला तुळजाई कला केंद्रावर आले होते त्यावेळी तिने नकार दिला, वाद झाला आणि बर्गे यांनी तिथून पुजाच्या घरी आईकडे जाऊन आत्महत्या केली. पुजा व बर्गे यांच्यात संबंध असल्याचे व इतर पुरावे पोलिसांना तपासात मिळाले आहेत.
कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे अंबिका कला केंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी तर रेणुका कला केंद्रसाठी परवाना मिळावा म्हणुन येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी अर्ज केला आहे तर लोकनाट्य कला केंद्रसाठी बाबासाहेब गाठे व सोलापूर बाळे येथील अक्षय साळुंके, तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे चंद्राई कला केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी अरविंद गायकवाड, आळणी येथे प्यासा केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी प्रस्ताव सादर केले आहेत.