Impact – खुल्या जागेवरील गुंठेवारी रद्द तर बांधकामाला स्थगिती , मुख्याधिकारी फड यांची कारवाई
घोटाळा उघड झाल्यावर नगर परिषदेचा सावध पवित्रा – अनेक विभाग सहभागी कारवाईकडे लक्ष
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद हद्दीतील सर्व्हे क्रमांक 129 मध्ये मंजुर रेखाकनातील खुल्या जागेवर देण्यात आलेले गुंठेवारीचे आदेश मुख्याधिकारी वसुधा फड यांनी लेखी आदेश काढत रद्द केले आहेत. खुल्या जागेवर भुखंड घोटाळाबाबत समोर आलेल्या कागदपत्रे आधारे गुंठेवारी रद्द केली आहे तर बांधकाम करू नये असे आदेश दिले आहेत. गुंठेवारी नियमीकरण प्रमाणपत्र व नकाशा रद्द करण्यात आला असुन बांधकाम परवानगीबाबत कलम 51 नुसार कारवाई प्रस्तावित केली आहे. या ठिकाणी कोणतेही विकास काम केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा गुणवंत वाघमोडे यांना दिला आहे.
नगर परिषद मुख्याधिकारी, सहायक निबंधक, गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी व एका खासगी व्यक्तीने संगनमत करुन खरेदीखत, गुंठेवारी व नियमबाह्य बांधकाम परवाना दिल्याची तक्रार राहुल विक्रम बागल यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे कागदपत्रासह दिली आहे. मंजुर रेखाकनातील खुल्या जागेवर (ओपन स्पेस) अनेक बाबी नियमबाह्य केल्याचा आरोप केला आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा खुलासा मुख्याधिकारी यांच्याकडून मागविला होता मात्र त्यापूर्वीच फड यांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
प्रसाद कृषी गृहनिर्माण संस्थेने सर्व्हे नंबर 129 मध्ये 3 एकर 6 गुंठे इतक्या क्षेत्रावर 2 फेब्रुवारी 1980 रोजी लेआउट केले त्याला 13 फेब्रुवारी 1981 रोजी रेखाकनास अंतीम मंजुरी मिळाली. गृहनिर्माण संस्थेच्या तत्कालीन चेअरमन व सेक्रेटरी यांनी सगनमत करुन रेखाकनात असलेली खुली जागा प्लॉट असल्याचे दाखवून अधिकारी यांच्याशी संगनमत करुन अब्दुल गणीशहा महमद यांना विक्री केली ती जागा गुणवंत वाघमोडे यांना पुन्हा विक्री केली.
वाघमोडे यांनी मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याशी संगनमत करुन रेखाकनामधील नगर परिषदेची खुली जागा स्वतःच्या नावे दाखवून नामांतर करुन घेतले व त्या जागेची फड यांनी चुकीच्या पद्धतीने गुंठेवारी आणि बांधकाम परवाना दिल्याचा आरोप बागल यांनी तक्रारीत केला आहे.
नगर परिषद, सहकार, भूमी अभिलेख यासह अन्य विभागाचा या घोटाळ्यात संबंध आहे त्यामुळे खुल्या जागेच्या या कथित भुखंड घोटाळा प्रकरणात जिल्हाधिकारी आता काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.