धाराशिव – समय सारथी
राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी तथा नाशिक महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम हे 17 ऑगस्ट रोजी शनिवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. गेडाम हे सकाळी 10 वाजता धाराशिव शहरातील शिंगोली रेस्ट हाऊसवर येतील त्यानंतर ते गाठीभेटी घेऊन दुपारी 12 वाजता सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन सोयीनुसार सोलापूरला जातील. डॉ गेडाम हे धाराशिव येथे जिल्हाधिकारी होते शिवाय ते राज्याचे कृषी आयुक्त होते. त्यांच्या स्वागत व सत्काराचा कार्यक्रम मित्र परिवाराच्या वतीने धाराशिव व तुळजापूर येथे ठेवण्यात आला आहे.
सामान्य नागरिकाला केंद्रबिंदु व त्याच्या समस्या सोडवण्याला डॉ गेडाम यांनी प्राधान्य देत कार्याचा ठसा उमटवला, त्यांचे कार्य व निर्णय लोक आजही आठवण काढताना दिसतात. डॉ गेडाम व धाराशिव याचे एक वेगळे घट्ट नाते असुन ते इथे कार्यरत असताना अनेक निर्णय महत्वाचे ठरले त्यात तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास, दुष्काळ उपाययोजना, जमिनीची अकृषी व रेखाकन नियमावली महत्वाची ठरली. सीना कोळेगाव येथील पाणी पश्चिम महाराष्ट्राला न सोडणे, बोगस डॉक्टर शोध मोहीम अंतर्गत एकाच दिवशी जवळपास 50 बंगाली डॉक्टरवर गुन्हे नोंद करण्यात आले. बोगस शिधा पत्रिका, रेशन धान्य माफिया, भुमाफिया यावर त्यांनी आळा घातला. तुळजाभवानी मंदीर संस्थानमधील दानपेटी व मठांना देण्यात आलेल्या जमिनीचा घोटाळा त्यांनीच उघड केला, जो की सध्या राज्यभर गाजत आहे. विविध प्रशासकीय निर्णय घेऊन त्यांनी सुसुत्रता आणली होती. शिस्तप्रिय व पारदर्शक कारभार करणारे अधिकारी अशी त्यांची राज्यभर ओळख आहे.
डॉ प्रवीण गेडाम हे 1999 साली नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एमबीबीएस झाले त्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. डॉ गेडाम यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर) पदवी प्राप्त केली. गेडाम हे 2002 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत त्यांना देशात 31 वा नंबर मिळाला होता.
गेडाम यांनी दापोली मध्ये प्रांतअधिकारी, जळगाव महापालिकेत आयुक्त, लातूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिवचे जिल्हाधिकारी, पुणे येथे भुजल विकास यंत्रणेचे संचालक, सोलापूर जिल्हाधिकारी, नाशिक महापालिका आयुक्त, परिवहन आयुक्त,केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे स्वीय सहायक आणि केंद्रीय आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, राज्याचे कृषी आयुक्त त्यानंतर आता नाशिक विभागीय आयुक्त आहेत