धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आदेशा नुसार तालुक्यातील ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीववर्धन होऊन ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यात येत आहे. येथे 30 खाटांचे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्यात येणार असून आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सहा उपकेंद्राच्या परिसरातील रुग्णांना दर्जेदार सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी दिली.
ढोकी हे गाव लातूर-पुणे राज्य महामार्गावरील मोठे गाव आहे. येथील बाजारपेठ मोठी असल्याने परिसरातील धाराशिवसह कळंब तालुक्यातील अनेक गावांचा येथे दैनंदिन संपर्क असतो. त्याचबरोबर महामार्गावरील गाव असल्यामुळे अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तडवळा, खेड, किणी, गोवर्धनवाडी, खामगाव, रूई या सहा उपकेंद्राचा आणि त्याअंतर्गत 24 गावांचा समावेश आहे. म्हणून ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन होऊन येथे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती.
सदरील मागणी विचारात घेऊन राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी ढोकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीववर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रूपांतर केले आहे. आता या भागातील रुग्णांना तातडीने रुग्णसेवा मिळणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नांमुळे आता रुग्णांना धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात येण्याऐवजी तेथेच उपचार मिळणार असल्याचे माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सांगितली.