छत्रपती संभाजीनगर – समय सारथी
सायबर गुन्ह्याशी संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलासा देणारा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे. बँक व पोलिस प्रशासनाने संशयाच्या आधारे याचिकाकर्त्याचे संपूर्ण बँक खाते गोठवले होते. मात्र, न्यायालयाने हस्तक्षेप करत सदर खाते तात्काळ अनफ्रीझ करण्याचे आदेश दिले.
सदर प्रकरणात याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. गणेश मुंडे यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. कोणतीही ठोस कारणे नोंदविल्याशिवाय व योग्य प्रक्रिया न पाळता संपूर्ण खाते गोठविण्यात आले असल्याचे त्यांनी न्यायालयास निदर्शनास आणून दिले. त्यामुळे याचिकाकर्त्याच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर गंभीर परिणाम झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रकरणातील तथ्यांनुसार, संबंधित खात्यावर सायबर गुन्ह्याचा संशय व्यक्त करत बँक व पोलिसांनी एकतर्फी कारवाई केली होती. मात्र, खात्यातील सर्व व्यवहारांवर बंदी घालणे ही अत्यंत कठोर कारवाई असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा प्रकारची कारवाई करताना नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खातेदाराला कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्टीकरण देण्याची संधी न देता संपूर्ण खाते गोठविणे योग्य नाही. तसेच, न्यायालयाने निरीक्षण केले की, तपासाच्या नावाखाली व्यक्तीच्या संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणणे अनुचित आहे. आवश्यक असल्यास संशयित व्यवहारांपुरती मर्यादित कारवाई करणे अपेक्षित आहे.
या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने बँक व पोलिसांनी केलेली खाते गोठविण्याची कारवाई रद्द ठरवली आणि संबंधित बँक खातं तात्काळ अनफ्रीझ करण्याचे आदेश दिले. तसेच, याचिकाकर्त्यास नियमित व्यवहार करण्यास कोणताही अडथळा निर्माण करू नये, असेही निर्देश देण्यात आले. हा निर्णय सायबर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये नागरिकांच्या आर्थिक हक्कांचे संरक्षण करणारा महत्त्वाचा ठरला आहे.











