आमदार सुरेश धस यांनी घातले लक्ष, बीडसह इतर ठिकाणी तपासणी सुरु
धाराशिव – समय सारथी
धाराशिवसह राज्यातील बोगस पीक विमा घोटाळा प्रकरणाचा केंद्रबिंदु बीड जिल्ह्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन बीडसह इतर जिल्ह्यात घोटाळा झाला का याचा शोध कृषी विभागाकडून घेतला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्यातील 24 पैकी 16 आरोपी हे बीड मधील असुन 7 जण हे हेळंब व परळी येथील आहेत, त्यात शेतकरी व सीएससी केंद्रचालक यांचा समावेश आहे. परळी, हेळंब यासह आसपासच्या गावातुन मोठे रॅकेट चालविले जात असल्याचा संशय तपास यंत्रणाना आहे. 24 पैकी 19 आरोपीना अटक करण्यात आले असुन 15 जणांना अटक करुन नियमित तर 4 जणांना अटकपुर्व जामीन झाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास करुन दोषारोप पत्र पाठवले असुन पुरवणी दोषारोप पत्र पाठविले जाणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या बोगस पीक विमा घोटाळा प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी लक्ष घालत विधीमंडळात आवाज उठवला आहे. धस यांनी धाराशिव पोलिस अधीक्षक यांना लेखी पत्र देत कारवाईची मागणी केली आहे शिवाय या गुन्ह्यातील तपासाचा प्रगती अहवाल व इतर माहिती विधीमंडळ कामकाजासाठी मागितली आहे. आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवल्यावर बीडसह काही जिल्ह्यात पीक विमा घोटाळा झाला का हे कृषी विभागाकडुन तपासले जात आहे. पुणे जिल्ह्यात 24-25 वर्षात 2 कोटी 11 लाख अर्ज आले त्यातील 3 लाख 32 हजार बोगस प्रस्ताव दाखल झाले असल्याची सूत्रांची माहिती आहे.
खरीप हंगाम 2023 पीक विमा घोटाळा प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात प्रगती अहवाल आमदार सुरेश धस यांनी पोलिस अधीक्षक यांना लेखी पत्र देऊन मागावीला आहे. पीक विमा गुन्ह्याचा अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत तपास अधिकारी म्हणुन कोणाची नेमणुक करण्यात आलेली आहे. जिल्हा स्तर कमिटी कृषी व इतर विभाग यांचे पिक विमा संदर्भात केलेल्या कारवाईचे अहवाल मागितले आहेत. खरीप हंगाम २०२३ मधे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नावे बनावट पिक विमा भरणाऱ्या एकूण किती शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली. किती व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे व अटक व फरार आरोपीची नावे. अपहराची रक्कम व किती सीएससी सेंटरवर गुन्हे दाखल करण्यात आले याची माहिती विधिमंडळ कामकाजासाठी मागितली आहे.
धाराशिव जिल्ह्यात कोट्यावधीचे बोगस पीक विमा प्रकरण उघड झाले असुन 7 एप्रिल 24 रोजी 24 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशी आदेश दिल्यानंतर घोटाळा उघड होऊन कृषी विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेत जमीन स्वतःची आहे असे दाखवून ऑनलाईन पीक विमा काढला या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याने सरकारने 3 कोटी 13 लाख रुपयांचा त्यांचा वाटा हिस्सा म्हणून पीक विमा हप्ता भरला त्यामुळे सरकारची फसवणूक झाली. जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने व त्यांच्या टीमने या प्रकरणाची चौकशी केली त्यानंतर कृषी उप संचालक बाबासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 15 कोटी 68 लाख रुपयांचा पीक विमा मिळावा यासाठी या सगळ्यांनी कट रचून फसवणूक केली त्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करुन 1 हजार 170 शेतकऱ्यांचा पीक विमा भरला. धाराशिव येथील आनंद नगर पोलीस ठाण्यात कलम 420 व अन्य कलमाने गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला असुन पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे याचा तपास करीत आहेत.