मुसळधार पाऊस, भुम परंडा भागात पुरस्तिथी, रस्ते पाण्यात संपर्क तुटला
धाराशिव – समय सारथी
एकेकाळी दुष्काळ व पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण भटकाव्या लागलेल्या धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना अतिवृष्टी व पुराचा फटका सहन करावा लागला आहे. दिवस रात्र कमी जास्त प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असुन आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल यंत्रणा दिवस रात्र काम करीत आहे.
धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने भुम परंडा वाशी या भागात पुन्हा एकदा पुरस्तिथी निर्माण झाली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असुन गेल्या दिवस रात्र सततधार पाऊस सुरु आहे. पुराची संभाव्य स्तिथी पाहता प्रशासनाने 3 हजार 615 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे, त्यातील सर्वाधिक 3 हजार 460 नागरिक एकट्या परंडा भागातील आहेत. सीना कोळेगाव, तेरणा, मांजरा यासह अन्य धरणातुन पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
परंडा तालुक्यातील 20 गावातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. वागेगव्हाण, देवगांव खु, शेळगांव, शिरसाव, देऊळगांव, जाकेपिंपरी/लाखी. तांदुळवाडी. आवार पिंपरी, वडणेर/सरणवाडी, उंडेगाव, शिराळा. भौत्रा, चिंचपूर बु., कारंजा, पांढरेवाडी, रोहकल, खासगांव, कपिलापुरी, नालगाव, खासापुरी या ठिकाणी भीषण स्तिथी आहे.
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजनुसार जिल्ह्यातील 2 लाख 26 हजार 706 हेक्टवरील पिके व फळबागांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. 1 हजार पेक्षा अधिक घरांची पडझड झाली असून 500 पेक्षा अधिक जनावरे मृत्यमुखी पडली आहेत. जिल्ह्यातील 363 गावांसह 1 लाख 98 हजार 375 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने वेगाने हाती घेतले असुन 15 तलाव फुटले आहेत त्यामुळे शेतकरी यांची शेती खरडून गेली आहे.
सीना कोळेगाव धरणातून 50 ते 80 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असुन सीना नदी काठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. इनगोदा वाटेफळ रोड पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद झाला आहे तर रत्नापूर-खंडेश्वरवाडी पालखी मार्गा पुलावर 5-6 फूट पाणी असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
सिना कोळेगाव धारणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असल्याने सिना कोळेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने सिना नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी, नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.पा ण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ/कमी होण्याची शक्यता आहे असे कार्यकारी अभियंता, सिना कोळेगाव प्रकल्प विभाग यांनी कळविले आहे.
चांदणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने चांदणी धरणाचे एकूण 28 स्वयंचलित गेट पैकी सद्यस्थितीत 7 स्वयंचलित गेट चालू असून चांदणी नदीपात्रात विसर्ग चालू आहे. चांदणी धरणात येणारा येवा विचारात घेता अजून गेट उघडण्याची शक्यता आहे तसेच धरणा मधून होणारा विसर्ग मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
खासापुरी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग नदीपात्रात चालू आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणाच्या सांडव्यावरून होणाऱ्या विसर्ग मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. चांदणी व उल्फा नदीच्या दोन्ही तिरावरील शेतकरी व नागरिक या सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.