धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात 7 आरोपींच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांच्या कोर्टात सुनावणी पुर्ण झाली यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी पोलीस व सरकारी पक्षाच्या वतीने सक्षमपणे प्रतिउत्तर देत युक्तिवाद सादर केला. ऍड देशमुख यांनी ड्रग्ज गुन्ह्यात जप्त मुद्देमाल हा ड्रग्ज असलेबाबत प्रयोगशाळेचा अहवाल सादर करीत उच्च व सुप्रीम कोर्टाच्या विविध निर्णयाचा दाखला देत आरोपींच्या जामिनीला विरोध केला. या 7 जणांच्या जामीन अर्जावर कोर्ट 2 मे रोजी शुक्रवारी निर्णय देणार आहे, यापुर्वी या कोर्टाने 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. कोर्ट काय निर्णय देते याकडे लक्ष लागले आहे. या 7 आरोपीसह राहुल कदम, संतोष कदम व अन्य अश्या 3 आरोपीनी अर्ज दाखल केला असुन त्यावर 5 व 6 मेला सुनावणी होणार आहे.
धाराशिव कारागृहातील आरोपी संदीप राठोड, अमित आरगडे, युवराज दळवी, संगीता गोळे, संतोष खोत व संकेत शिंदे या 6 जणांसह मुंबई येथील फरार आरोपी वैभव गोळे यांनी अटकपूर्व असे 7 जणांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तुळजापूर ड्रग्ज गुन्ह्यात 36 आरोपी असुन 14 जेलमध्ये तर 22 फरार आहेत, पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी बाजु मांडताना सांगितले की, संगीता व वैभव गोळे हे पती पत्नी ड्रग्ज सप्लायर असुन आरोपी युवराज व संदीपकडुन वाहन जप्त केले आहे, ज्यात ड्रग्ज होते. वाहन त्यांच्या ताब्यात होते त्यात ड्रग्ज सापडले.त्यांच्या खिशातून ड्रग्ज जप्त करणे गरनेचे नाही, गुन्ह्यात त्यांचा थेट सहभाग आहे. काही आरोपी विरोधात पुर्वीचे गुन्हे, गुन्हेगारी पार्शवभुमी आहे, गुन्ह्याचा अजुन तपास होणे बाकी आहे त्यामुळे फरार आरोपींची पोलीस कोठडी गरजेची आहे. गुन्ह्यांचे स्वरूप, उपलब्ध पुरावे पाहता जामीन नाकारावी असे देशमुख म्हणाले.
इन्व्हेंटरी प्रमाणपत्रात जप्त मुद्देमाल वजन हे झिरो ग्रॅम असल्याचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनी मांडला होता तो कोर्टात खोडून काढण्यात आला. पोलिसांनी ज्यावेळी मुद्देमाल जप्त केला त्यावेळी 59 पुड्या होत्या व त्यांचे वजन 45 ग्रॅम होते. पोलिसांनी त्यातील एक एक ग्रॅम अश्या 2 नमुने सॅम्पल व 43 ग्रॅम असे तिसरे सॅम्पल काढले.
पोलिसांनी मुद्देमाल जप्त करताना सम्पेल काढावे की न्यायाधीश समोर काढावे यावर युक्तिवाद झाला. तपास अधिकारी याचा अधिकार व पर्याय असल्याचे देशमुख यांनी सांगत ते न्यायाधीश समोर काढावे असे बंधनकारक नाही. 3 सील पॉकेटमध्ये व्हाईट पॉवडर असल्याचे लेखी नमुद आहे व एकात रिकाम्या प्लास्टिक पुड्या. सॅम्पल 1 मध्ये व्हाईट पावडर व उग्र वास असा उल्लेख आहे. फोटो, वीडियोमध्ये सॅम्पल व्हाईट पावडर आहे. मॅजिस्ट्रेट यांनी सुद्धा पावडर असल्याचे म्हण्टले आहे. शिवाय लॅबचा अहवाल ड्रग्ज आला आहे. जे सॅम्पल पाठवण्यात आले त्यावर कोर्टाचे सील आहे. केमिकॅल तपासणीसाठी मुद्देमाल लॅबला पाठवणे हा सॅम्पलचा उद्देश आहे असे मांडत काही निर्णयाचे दाखले देण्यात आले.
एखाद्या बाबतीत काही प्रक्रिया पाळली नाही किंवा त्रुटी राहिली तर ती बाब बेकायदेशीर नसुन प्रक्रियाची अनियमीतता असल्याचे मानले जाते यासाठी सुप्रीम कोर्टाच्या खंडपिठाचे निर्णय कोर्टात सादर करण्यात आले.संशयाचा फायदा आरोपीला मिळणार नाही. समाजावर ड्रग्जचा होणारा दुर्गामी परिणाम, हा कायदा अस्तित्वात का आला, हा गुन्हा समाजा विरोधात असुन समाज ड्रग्ज मुक्त ठेवणे हा हेतू आहे. प्रक्रियामधील अनियमीततेचा,संशयाचा फायदा आरोपीला नाही. जप्त मुद्देमाल हा महत्वाचा प्राथमिक पुरावा आहे आणि तो ड्रग्ज असल्याचा लॅबचा अहवाल आला आहे.
मुद्देमाल जप्त करताना सॅम्पल कधी, किती व कसे काढावे हे नमुद आहे. न्यायाधीशासमोर 5 ग्रॅम काढावे असे नमुद आहे. फोटो व व्हिडिओग्राफी वेगळी आहे मात्र चार्जशीटमध्ये व्हिडिओग्राफी नमुद नाही मग व्हिडिओ कुठून आला, ते नंतर तयार केली का असा प्रश्न ऍड अंगद पवार यांनी उपस्थितीत केला. तपासणीसाठी 5 ग्रॅम नमुना गरजेचा आहे तरच त्याचे परीक्षण होऊ शकते. सॅम्पल घेण्याचे अधिकार पोलिसांना नाहीत. इन्व्हेस्टरीमध्ये 1 ग्रॅम सुद्धा नसताना अहवाल ड्रग्ज असल्याचा आला हे जगातील 8 वे आश्चर्य आहे.सॅम्पल शुन्य वजन असताना ड्रग्ज अहवाल पॉझिटिव्ह आला कसा हा धक्कादायक आहे असे ते म्हणाले. कारागृहात कैद्याला बसायला जागा नाही, सरकारचा खर्च का वाढवता, आरोपी भविष्यात निर्दोष सुटणार असतील तर त्यांना अटक व जेलमध्ये का ठेवता असे ऍड पवार म्हणाले. भावनिक मुद्याला महत्व नाही असे निकाल आहेत. गुह्यातील आरोपी आहेत हे अजुन सिद्ध झाले नाही, तपास पुर्ण झाला असुन कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत त्यामुळे आरोपीनी पुरावा फोडण्याचा प्रश्न नाही असे उत्तर ऍड विशाल साखरे यांनी दिले.