उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव व औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात नामांतर विरोधी याचिका दाखल करण्यात आली होती त्यावर 29 सप्टेंबरला सुनावणी झाली, वेळेअभावी उर्वरित पुढील सुनावणी 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
धाराशिव – समय सारथी
शिंदे-पवार व फडणवीस यांच्या सरकारने हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या पुर्वसंध्येला धाराशिव व छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले होते. राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केल्यामुळे जिल्हा, तालुका, उपविभाग, गाव याचे नाव धाराशिव व छत्रपती संभाजीनगर झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मंत्रीमंडळासह नामांतराच्या बोर्डाचे अनावर केले.
सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केल्यावर तात्काळ प्रशासनाने सर्व शासकीय कार्यालय वरील उस्मानाबाद व औरंगाबाद नावाचे सर्व बोर्ड बदलून त्यावर धाराशिव व छत्रपती संभाजीनगर असे बदल केले. महसूल, जिल्हा परिषद, पोलिस, एसटी विभागासह अन्य कार्यालयानी शासकीय बोर्ड बदलले असुन धाराशिव नावाने प्रशासकीय कारभार सुरु केला आहे. ई-मेलसह वेबसाईटवर धाराशिव नावाचे बदल केले आहेत.
झालं रं झालं धाराशिव झालं, बोला रे बोला धाराशिव बोला, आपला जीव धाराशिव अशी घोषणाबाजी करीत या निर्णयाचे स्वागत केले. सुरुवातीला ठाकरे सरकारने नामांतर करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सत्ता बदल झाल्यावर शिंदे यांनी ठाकरे यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुन्हा शिंदे सरकारने निर्णय घेतला आहे मात्र त्याला पुर्वीप्रमाणे उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे.
सरकारच्या याबाबतच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या याचिका मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आल्या त्यावर सुनावणी झाली व उर्वरित सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.