आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार, रुग्ण व्यवस्थेसाठी कटीबद्ध – आरोग्यमंत्री डॉ सावंत
मुंबई – समय सारथी
राज्यातील 1 हजार 446 डॉक्टरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व पवार, आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने नियुक्ती पत्र देण्यात आले. नौकर भरतीमध्ये पारदर्शकता यावी म्हणून ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली यामुळे आरोग्य यंत्रनेवरील ताण कमी होणार असुन रुग्णसेवेला मदत होणार आहे.
राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदाबाबत महायुतीचे सरकार कायमच सकारात्मक राहिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय डॉक्टरांच्या रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ या संवर्गातील ‘वैद्यकीय गट-अ’ पदासाठी विभागाच्या पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते.
पदभरती प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले होते. यात एकूण 29 हजार 555 उमेदवारांनी अर्ज केले होते. यापैकी एमबीबीएस साठी 6 हजार 575 उमेदवारांनी तर बीएएमएस साठी 22 हजार 981 उमेदवारांनी अर्ज केले होते. या प्राप्त अर्जांची छाननी व कागदपत्राची पूर्तता करण्याचे काम 23 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करून 28 फेब्रुवारी रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. या गुणवत्ता यादीनुसार 1 हजार 446 उमेदवार पात्र ठरले आहेत.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या प्रारंभी विधानभवन मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदासाठी निवड झालेल्या 1 हजार 446 उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या आयडीमध्ये नियुक्ती पत्र पाठवण्यात आले.
गेल्या काही दिवसापूर्वीच आरोग्य विभागाच्या वतीने एकूण 10 हजार 949 पदांसाठी मेगा भरती घेण्यात आली होती. या मेगा भरतीच्या पूर्ततेनंतर आता आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात येत असल्याने मनुष्यबळाअभावी आरोग्य व्यवस्थेवर पडत असलेला ताण आता नाहीसा होणार आहे. तसेच राज्यातील नागरिकांना चोख, विनाविलंब व सुलभ आरोग्य सुविधा पुरविणे शक्य होणार आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असे आरोग्यमंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.
विधानभवनात झालेल्या या कार्यक्रमाला मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.