धाराशिव – समय सारथी
जिल्हा शल्य चिकित्सक अर्थात सिव्हील सर्जन म्हणून प्रमोशन हवे असल्यास 25 लाख मोजा, सार्वजनिक आरोग्य भ्रष्टाचार अशी पोस्ट धाराशिव येथील एका ज्येष्ठ डॉक्टर यांनी फेसबुक या सोशल मीडियावर टाकल्यानंतर मोठी खळबळ उडाली असुन रेटकार्ड, आरोग्य यंत्रणातील भ्रष्टाचार यावर चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक ही पोस्ट आरोग्य विभागात दाम कमवून देणारी क्रीम पोस्ट म्हणून ओळखली जाते, त्यासाठी लाखो मोजावे लागत असल्याचा आरोप खुद्द एका डॉक्टरने केला आहे.
धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक ही पोस्ट सध्या रिक्त असुन अनेक जण यासाठी उत्सुक व गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. 25 लाख मोजा या पोस्टने जणू या पदाचा रेट काय सुरु आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. इच्छित स्थळी डेप्युटेशन प्रतिनियुक्ती याचे दर वेगळे असुन दलालाची संख्या वाढली असुन शिवाय एकमेकांना चेक मेट व कुरघोडी करण्यात रेटकार्ड बरेच मोठे झाले आहे.
तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांची बदली केल्यानंतर हे पद रिक्त आहे. डॉ गलांडे यांच्यावर नियमबाह्यरित्या बदली, परवाना, मान्यता यासह गैरकारभाराची व रुग्ण असुविधेची तक्रार होती. डॉ गलांडे यांच्या काळात जिल्ह्यात प्रतिनियुक्तीसाठी ठराविक रेटकार्ड बनवत त्यांनी जोरदार वसुली केली होती.
अनेक खासगी रुग्णालयात शासकीय सुविधा व योजनाची मान्यता देण्यासाठी प्रति बेड,दप्तर तपासणीसाठी एक रेटकार्ड होते शिवाय वसुलीची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत केली होती. आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या कार्यकाळात डॉ गलांडे यांनी करुन दाखविल्याने त्यांचे एकप्रकारे डिमोशन करीत लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील ग्रामीण रुगणालयाचे वैद्यकीय अधीक्षक या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सध्या एका कर्मचारी कम दलालाची पैसे देऊन ‘पाद्य’ पुजा करावी लागते तरच कामाचा मार्ग सुकर होतो.
आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे जाहीर भाषणात, मी पैसे घेत नाही, मी घेणारा नाही तर देणारा हात आहे. मला इतर मंत्र्यासारखी टक्केवारी चालत नाही किंवा घेत नाही असे सांगतात. मंत्री घेत नाही तर मग हा पैसा कोण घेतो व कुठे मुरतो ? दलालांची साखळी आजही मोठ्या जोमाने उघडपणे सक्रीय आहे, हे वास्तव आहे.
बीडसह अन्य ठिकाणी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांच्या निलंबन आदेशाला मॅट कोर्टाने स्थगिती दिली, ही आरोग्य विभागासाठी मोठी चपराक ठरली. साबळे यांना स्थगिती मिळाली मात्र त्यापुर्वी डॉ अशोक बडे यांची नियुक्ती झाली त्याबाबतही चर्चा आहे.
आरोग्य विभागात बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यात एक दीड वर्षाला जिल्हा शल्यचिकित्सक हे बदलले गेले त्यांच्यावर आरोप केले गेल्यानंतर नवीन लोकांचे रेट साहजिकच वाढले. नवीन अधिकारी नेमताना दलाल यांचा हस्तक्षेप व तोच रेटकार्डचा खेळ ‘टेंडर’ भरून चढाओढीने खेळला गेला.
दलालीचे स्वरूप बदलले असुन आरोग्य खात्यातील दलालांची साखळी तोडण्यात मंत्री सावंत यांना सपशेल अपयश आलेले आहे.