धाराशिव – समय सारथी
उत्सव नवरात्रीचा महाराष्ट्राच्या आरोग्याचा असा नारा देत आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून तुळजाभवानी नवरात्र उत्सवात 27 ते 29 ऑक्टोबर या काळात 3 दिवसांचे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्यमान भव अंतर्गत महाआरोग्य शिबिराची तयारी अंतीम टप्प्यात असुन नवरात्र काळात भाविकांच्या सोयीसाठी 13 ते 30 ऑक्टोबर या काळात आयसीयु सुविधा सुरु करण्यात आली आहे.
महाआरोग्य शिबिरास अनेक तज्ज्ञ डॉक्टर रुग्णसेवा बजावणार आहेत. पंढरपूर येथे वारीच्या काळात देखील असेच महाआरोग्य शिबीर घेतले होते त्याच धर्तीवर आता तुळजाभवानी नवरात्र काळात पहिल्यांदा असे भव्य दिव्य महाआरोग्यशिबीर होत आहे.
नवरात्र काळात नवोदय विद्यालय नळदुर्ग रोड, तुळजाभवानी मंदीर परिसर,घाटशीळ व धाराशिव रोड, उपजिल्हा रुग्णालयात व महाआरोग्य शिबिराच्या ठिकाणी सोलापूर रोडवर आयसीयु सुविधा सुरु करण्यात आली आहे.
महाआरोग्य शिबिरात मोफत निदान व औषध उपचार, टेली कन्सलटेशन, स्क्रिनिंग, आभा व आयुष्यमान ओळखपत्र तयार करणे,प्रसूती व स्त्री रोग, कान नाक घसा, स्वच्छता अभियान आयुष्यमान मेळावा, रक्तदान व अवयवदान जनजागृती मोहीम, आयुष्यमान सभा व आयुष्यमान आपल्या दारी, अंगणवाडी व प्राथमिक शाळामधील 18 वर्षा खालील मुलांची तपासणी केली जाणार आहे.
18 वर्षावरील सर्व पुरुषांची मोफत सर्वकश आरोग्य तपासणी करण्यात येणार असुन आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया, मोठ्या शस्त्रक्रिया आवश्यकता असल्यास रुग्णांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनाचा लाभ व ई संजीवनी टेली कन्सलटेशन माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर यांच्याशी संवाद साधून सुविधा उपलब्ध केल्या जातील.