धाराशिव – समय सारथी
सोन्याच्या भाव गगनाला भिडलेले आहेत. सर्वसामान्य व्यक्ति सोन खरेदीचा विचार ही करत नाही. प्रत्येक व्यक्ती आहे ते सोन सांभाळून ठेवण्याचाच प्रयत्न करतोय. म्हसोबाचीवाडी, ता. वाशी, जिल्हा धाराशिव येथील गरीब शेतकरी लक्षण भानुदास कात्रे यांनीही आयुष्यभर कष्ट करून एक एक रुपया जुळवून स्त्रीधन व इतर दागिने तयार केलेले. त्या गरीब शेतकऱ्याने त्याच्याकडील सोने एका स्टीलच्या डब्ब्यात ठेऊन तो डब्बा ज्वारीच्या पोत्यात ठेवला होता.
दिवाळीचा सण आल्याने सणासाठी पैशाची गरज असल्याने गडबडील तीन पोती ज्वारी कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथील हनुमान लीला ट्रेडिंग कंपनी प्लॉट नं. 108 आमोल ज्ञानदेव कानकात्रे यांच्या अडतीत टाकली होती. ज्वारीच्या पोत्यांची पलटी मारताना अमोल कानकात्रे व मुनीम रवींद्र बिभीषण गादेकर यांना त्यात स्टीलचा डब्बा मिळून आला. त्यात पाहिले असता सोन्याचे मंगळसूत्र, गंठण, कानातले असे तब्बल चार तोळे सुमारे पाच लाख वीस हजार किमतीचे सोन्याचे दागिने मिळून आले.
अमोल कानकात्रे यांनी तात्काळ समंधित शेतकऱ्याशी संपर्क करून सदर दागिने त्यांच्या ताब्यात दिले. आयुष्भराची कामावलेली पुंजी अनावधानाने हरवलेली पण कनकात्रे यांच्या प्रामाणिकपणा मुळे परत ही मिळून आल्याने शेतकरी लक्ष्मण भानुदास कात्रे यांना गहिवरून आले. त्यांनी अमोल कनकात्रे व त्यांच्या अडती मध्ये काम करणाऱ्या कर्माचारी यांचे आभार मानले.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापारी अमोल कानकात्रे यांच्या प्रामाणिकपणा मुळे समस्त व्यापारी वर्ग व बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती वरील विश्वास दृढ झाला आहे. अमोल काणकात्रे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे.