धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या चरणी अज्ञात भाविकाने चोपदार दरवाज्यातील सिंहासन पेटी 2 मध्ये 1 किलो 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दान केले. 100 ग्रॅम वजन असलेली 11 सोन्याची बिस्कीट या दानपेटीत टाकण्यात आली असुन त्यावर 999 म्हणजे शुद्ध 24 कॅरेट सोने असे लिहले आहे, या 1 किलो 100 ग्रॅम सोन्याचे बाजार मूल्य 1 कोटी रुपयांच्या घरात आहे. 28 मार्चला शुक्रवारी दानपेटी उघड केल्यावर हा प्रकार लक्षात आला. तुळजाभवानी मंदिरातील सर्व सिंहासन पेट्या व दानपेट्या सोमवार, बुधवार व शुक्रवारी अश्या आठवड्यातुन 3 वेळेस धर्मादाय आयुक्त कार्यालय प्रतिनिधी व इतरांच्या उपस्थितीत सीसीटीव्ही निगराणीत उघडल्या जातात, यासाठी 3 वेगवेगळी पथक आहेत. मंदिरात चोपदार दरवाजा, सिंह गाभारा, आरती ठिकाण अश्या 7 सिंहासन पेट्या असुन उपदेवता व मंदीर परिसरातील 40 दानपेट्या व 4 गुप्तदान पेट्या आहेत.
तुळजाभवानी मंदिरात सोने दान करणाऱ्याची एक कार्यपद्धती आहे, ज्यात सोने जमा केल्यावर मंदिर संस्थान वजन करुन पावती देते व त्यावर सोने सदृश्य वस्तू असे नमुद करते व नंतर शुद्धता तपासते. अर्पण केलेल्या 11 बिस्कीटवर 999 असे लिहले असले तरी त्याची शुद्धता पडताळणी केली जाते.