धाराशिव – समय सारथी
धावत्या ट्रकवर चढून चोरी करणाऱ्या टोळीला धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असुन या टोळीतील 6 जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीच्या चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला. पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हे आरोपी दुसरा एक गुन्हा करण्याच्या तयारीत असताना एका गाडीत होते, पोलिसांनी रंगेहात पकडून मोबाईल, चारचाकी, चाकू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असुन इतर गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
सोलापूर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर तेरखेड्याजवळ भर दिवसा चालत्या ट्रकमधून चोरी करणाऱ्या चोरट्यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती आणि महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अखेर व्हिडिओमधील सहा जणांच्या टोळीला बेड्या ठोकण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. या कारवाईमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी, ट्रकचालकांनी समाधान व्यक्त केले.