धाराशिव – समय सारथी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट (जि. सोलापूर) येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवकरांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला, जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले, यावेळी संघटना यांनी आक्रमक भुमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली, त्यानंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार स्वतः निवेदन स्वीकारण्यासाठी दालनात आले तेव्हा तणाव शांत झाला.
गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बहुजन समाजातील तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि सर्व जाती-धर्मांमध्ये सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रवीण गायकवाड यांनी घेतलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचे नमूद करत, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
निवेदनात, लोकसभा निवडणुकीदरम्यान गायकवाड यांनी संविधानाची बाजू घेत भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेचा राग ठेवून भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी दीपक काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून गायकवाड यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता का, याचा तपास व्हावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. हल्लेखोरांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, असा पुनरुच्चार यामधून करण्यात आला आहे.